अकोला:दि.29: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता मर्यादीत संख्येत कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करुन साध्या पद्धतीने आयोजीत करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
यावेळी डॉ. भाले यांनी माहिती दिली की, या समारंभास राज्यपाल तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे आभासी पद्धतीने अध्यक्षस्थान भूषवतील. तर प्रत्यक्षरित्या सन्मानीत अतिथी म्हणून कृषिमंत्री दादासाहेब भुसे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप महासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले हे स्वागतपर भाषण व अहवाल वाचन करतील. या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्मानीय सदस्य, विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू सोबतच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचे सन्मानीय कुलगुरू विचारमंचावर उपस्थित राहतील.
या दीक्षांत समारंभात एकूण 3359 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये 1258 स्नातकापैकी दीक्षांत समारंभात 24 आचार्य पदवी धारक स्वत: उपस्थित राहून आपली पदवी स्वीकारतील. तर उर्वरित 1234 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर पदवी स्वीकारतील. तसेच विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यात 31 सुवर्ण, 16 रौप्यपदके, 33 रोख तर तीन जणांना पुस्तकी स्वरुपात असे एकूण 83 जणांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. सोबतच 27 जणांना डॉक्टर ऑफ फेलोशिपची पदवी या सभारंभात वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले यांनी दिली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ.राजेंद्र गाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख किशोर बिडवे यांनी केले.