Rahul Gandhi on Pegasus Issue : पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी काँग्रेसने जी भूमिका घेतली होती त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले. पेगॅसस प्रकरणी केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली असून आता सत्य लवकरच समोर येईल असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पेगॅसस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र्य समितीच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष तसेच अनेक महत्वाच्या व्यक्तींनी या आधी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पेगॅसस प्रकरणी एक समिती निर्धारित केली असून त्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.
निवृत्त न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या समितीत डॉ. नवीन कुमार चौधरी, डॉ. प्रभाकरन आणि डॉ. अश्विन अनिल गुमस्ते हे तांत्रिक सदस्य असतील. तर अलोक जोशी आणि संदीप ऑबेरॉय हे सायबर एक्सपर्ट असतील. सरकारला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला, पण सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सांगत उत्तर दिलं नाही. सरकारनं आरोपांचं खंडन केलं नाही. न्यायालय मूकदर्शक बनून राहू शकत नाही, असं सांगत चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं केली.
पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेगॅसस स्पायवेअर हे केवळ जगभरातील सरकारांना विकण्यात आलं असल्याचं इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने वारंवार स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतात याचा वापर केवळ भारत सरकारने केला असल्याचं स्पष्ट होतंय असा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला होता.
इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे.
दोन वर्षांपूर्वी, 2019 साली हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅपने भारतातील काही पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एक मेसेज करुन त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरने हेरगिरी केल्याचं सांगितलं होतं. या स्पायवेअरच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये हेरगिरी होत असल्याचं आणि गोपनीय डेटा चोरी होत असल्याची जराही कल्पना येत नाही इतकं ते गुप्तपणे काम करतं. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्या देशातील पत्रकार आणि विरोधात बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायलच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे.