अकोला :दि.२१: कोविड लसीकरण मोहिम सुरु असून या मोहिमेला वेग यावा व अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी रास्तभाव दुकानांवर लसीकरण केल्यानुसार लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने सेवा द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
याबाबत एका परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत की, जिल्ह्यात रास्त भाव दुकानांवर धान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी एखाद्या लस न घेतलेल्या व कोविडची लागण असलेला लाभार्थी रांगेत असल्यास अन्य लोकांनाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी धान्य घेण्यासाठी दुकानात येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांपैकी ज्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. लसीचा एक डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह असणाऱ्या लाभार्थ्यांस दुय्यम प्राधान्य द्यावे. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांना लसी घेण्याबाबत प्रोत्साहित करावे, जेणे करुन लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण होईल व लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढेल व १०० टक्के लसीकरण होईल.