नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ( Dearness Allowance ) तीन टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचार्यांचा तसेच सेवानिवृत्तीधारकांचा महागाई भत्ता ( Dearness Allowance ) आता 31 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महागाई भत्त्यात ( Dearness Allowance ) वाढ करण्याच्या निर्णयाचा लाभ एक कोटींपेक्षा जास्त कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना मिळणार आहे. 1 जुलै 2021 पासून वाढीव महागाई भत्ता लागू राहील. वरील निर्णयापोटी सरकारने 9488 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली. केंद्र सरकारने गत जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची भरघोस वाढ करुन ती 28 टक्के इतकी केली होती.
कामगार मंत्रालयाने अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचे तीन महिन्यांचे आकडे जारी केले होते. हा निर्देश वाढल्यामुळे केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करु शकते, असा अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे प्रवासी भत्ता, शहर भत्ता, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युईटी यामध्येही वाढ होणार आहे. ज्या कर्मचार्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये इतके आहे, त्याला यापुढील काळात 5580 रुपये महागाई भत्ता प्राप्त होणार आहे.