विवेक वि. सरपोतदार
अश्विन महिन्यातील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्विन शुद्ध दशमीला आपण ‘दसरा’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा केला जातो.
माता पार्वतीने ‘विजया’ नाव धारण करून नवरात्रीतील नऊ दिवस व नऊ रात्र दुर्गासुराशी युद्ध करून दहाव्या दिवशी वध केला व विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजया देवीच्या स्मरणार्थ ‘विजयादशमी’ म्हणूनही ओळखले जाते. दुसऱ्या एका कथेनुसार देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याला ठार मारले तेही याच दिवशी.
चौदा वर्षांच्या वनवासात लंकाधिपती रावणाने सीतामाईंचे हरण करून बंदिवासात ठेवले, त्यातून सीतामाईंची सुटका करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी विजयादशमीच्याच दिवशी रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस लंकेकडे कूच केले. यात त्यांना यशही मिळाले. या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
दसऱ्याला शमी व आपटा वृक्षाची पूजा करण्याची व आपटा वृक्षाची पाने ‘सोने’ म्हणून एकमेकांना देण्या-घेण्याची प्रथा आहे. याबद्दल काही कथा आहेत. वरतंतू ऋषींकडून ज्ञान प्राप्त केल्यावर ऋषींनी न मागताही कौत्स या शिष्याने गुरूदक्षिणा देण्याचा आग्रह केल्याने ऋषींनी चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यास सांगितले.
त्यावेळी श्रीरामाचा पूर्वज अयोध्येच्या रघुराजाकडे कौत्साने विनंती करताच उदार रघुराजाने सुवर्णमुद्रा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार इंद्राबरोबर युद्ध करावयास निघालेल्या रघुराजाच्या अयोध्यानगराबाहेर सीमेवरील शमीच्या व आपट्याच्या वृक्षांवर इंद्र कुबेराकरवी सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवितो. यातील कौत्स फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा आपल्या गुरूंना गुरूदक्षिणा म्हणून नेतो. पण उरलेल्या सुवर्णमुद्रा रघुराजा आपल्या प्रजेला घेण्यास सांगतो. याचे प्रतीक म्हणून शमी व आपटा वृक्षाची पूजा केली जाते. तसेच आपट्याची पानेही लुटली जातात.
परंतु, आजचा व भविष्यातील पर्यावरणाचा विचार करता आपण शमी व आपटा वृक्षांची आहेत ती झाडे जपून या दिवशी नवीनही लागवड करूयात. तसेच आपट्याची पाने ओरबाडून न घेता एखादे पान लुटण्याचा प्रयत्न करू, यातही बाजारातून कांचन सारख्या खोट्या आपट्याची पाने विकत न आणता, लुटलेल्या सर्व पानांचे नंतर खत होईल याची दक्षता घेऊ म्हणजे परंपरेबरोबर पर्यावरणही जपू.
वनवास संपल्यावर पांडवांनी शक्तीपूजन करून शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर विजयादशमीच्याच दिवशी स्वारी करून विजय मिळविला. यामुळे शूरलोक या दिवशी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात तर व्यावसायिक लोक आपापल्या कामांची हत्यारे, यंत्रसामग्री यांची पूजा करतात.
दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सवही आहे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करतात. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या वेदीवर किंवा परडीत सात धान्यांची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या घराच्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते.
तसेच विद्येची देवता सरस्वती हिचे पूजन दसऱ्याच्याच दिवशी करण्याची प्रथा आहे. या दिवशी अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा आणि याचसोबत आनंद, समाधान आणि संपन्नता मिळवून आणायची. यश, कीर्ती प्राप्त करायची व धनसंपदा लुटण्याचा, परस्परांत प्रेम वाढवण्याचा हाच खरा कालचा आणि आजचा दसरा. सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने आपण सर्वांनी करोनासंबंधीचे सर्व नियम काटेकोर पाळूनच दसरा व पुढे येणारे सर्व उत्सव आनंदात साजरे करूयात.