नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरातील वाढ हा सध्या देशात कळीचा मुद्दा बनला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांनी सामान्य नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. पेट्रोल डिझेलसोबतच विमानासाठी वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच एअर टर्बाइनचेही दर वाढले होते. मात्र आता हरियाणा सरकारने घेतलेल्या निर्णयाने एअर टर्बाइन लवकरच स्वस्त होण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने आता विमानाच्या इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणा सरकारने एअर टर्बाइनवरील दर 20 टक्क्यांवरून 1 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. हरियाणामधील गुरूग्राममध्ये 2023 पर्यंत हेली- हब उभारण्यात येणार आहे. कर्नाल आणि अंबाला हवाई पट्ट्याही विकसित केल्या जाणार आहेत. याशिवाय याठिकाणी इंटरसिटी आणि इंट्रासिटी हेलिकॉप्टरही सुरू होणार आहेत. अशी माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आह
ऑक्टोबरपासून एअर टर्बाइनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या जेट फ्युईलचा दर 72,582 रूपये इतका आहे. इंडीयन ऑईलच्या संकेतस्थळावर हे दर दिलेले आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे हवाईप्रवासाच्या तिकीट दरातही पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र लवकर पुरवठा वाढेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. यावेळी हरियाणामधील नवीन प्रकल्पांबद्दल देखील चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत मनोहरलाल खट्टर यांनी 2023 पर्यंत हेली-हब उभारण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे. या हबमुळे हरियाणाच्या विकासाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.