अकोला: दि.13 : तोक्ते चक्रीवादळ व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी 84 कोटी 26 लक्ष रुपये मदत वाटपास सर्व संबंधित तहसिलदारांकडे वितरीत करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निगर्मित केले आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधितांना यापुर्वी 8 कोटी 96 लक्ष रुपये मदतनिधी वितरीत करण्यात आला होता. त्यात अकोला तालुक्याकरीता 5 कोटी 90 लक्ष तर बार्शीटाकळी तालुक्याकरीता 3 कोटी 6 हजार रुपये तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीतांना वितरीत करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीपिकांच्या तसेच अन्य नुकसानीकरीता बाधित नागरीकांना मदत वाटपाकरीता 84 कोटी 26 लक्ष निधी वितरीत करण्यात आले आहे. त्यात अकोला तालुक्याकरीता 32 कोटी 71 लक्ष, बार्शिटाकळी तालुक्याकरीता 16 कोटी 67 लक्ष, अकोट तालुक्याकरीता 4 कोटी 10 लक्ष, तेल्हारा तालुक्याकरीता 1 कोटी 51 लक्ष, बाळापूर तालुक्याकरीता 14 कोटी 63 लक्ष, पातुर तालुक्याकरीता 14 कोटी 21 लक्ष तर मुर्तिजापूर तालुक्याकरीता 43 लक्ष असे एकूण 84 कोटी 34 लक्ष 96 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आले असून हा निधी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीतांना वितरीत करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.