अकोला: दि.९ जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सुरु करण्यात आले आहे. या अभियानात करावयाच्या लसीकरणास गति यावी यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी एका आदेशाद्वारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असून संबंधितांनी त्यानुसार लसीकरण मोहिमेस गति द्यावी असे निर्देश दिले आहेत.
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तथापि, लसीकरणाच्या वेग कमी असल्याने त्यास गती देण्याची गरज आहे.सध्याच्या परिस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करुन घेणे महत्वपूर्ण बाब आहे.
अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते आठवी व आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे सर्व प्रकारच्या सेवा सुरु झाल्या आहेत व प्रार्थना स्थळे सुद्धा भाविकांकरिता उघडण्यात आली आहेत. त्यामुळे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यात दि. १४ पर्यंत विशेष लसीकरण मोहिम राबवून लसीकरणाचा वेग वाढविणे बाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केल्या आहेत.
मार्गदर्शक सुचना याप्रमाणे-
१) मुख्याध्यापक – जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते आठवी व आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र बंधनकारक करावे. शाळेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी लसीकरण केले आहे किंवा कसे? या बाबत माहिती प्राप्त करुन घ्यावी. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे पालकांनी तसेच घरी असलेल्या सर्व व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. ज्या पालकांचे लसीकरण झाले नाही, अशा पालकांना दि.१५ पर्यंत लसीकरण करुन घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचित करावे.
२) महाविद्यालय प्राचार्य – ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरु झाले आहेत, बहुतांशी विद्यार्थी हे १८ वर्षाच्या वरील असल्यामुळे त्यांचे व त्यांच्या पालकांचे व घरातील इतर व्यक्तींचे लसीकरण झाले असल्याबाबत संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. लसीकरण प्रलंबित असलेले विद्यार्थी व पालकांना दि. १४ पर्यंत लसीकरण करुन घेण्याचे व त्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बाबत सूचित करण्यात यावे.
३) दुकानदार / व्यवसायिक – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सर्व प्रकारच्या सेवा सुरु झाल्या असल्यामुळे बाजारपेठेमधील सर्व दुकानदार / व्यवसायिक यांनी स्वतःचे व आपल्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करुन घ्यावे. त्याच प्रमाणे दुकांनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व त्यांचे कुटूंबातील सर्व व्यक्तींचे लसीकरण झाले असल्याबाबत खात्री करणे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही अशा कर्मचाऱ्यांना दि.१४ पर्यंत लसिकरण करुन घेणे बाबत सूचित करावे.
४) औद्योगिक वसाहत – एम.आय.डी.सी. क्षेत्रामधील कारखाने व उत्पादन करणारे आस्थापना या ठिकाणी काम करणारे कामगार हे विविध परिसरातून येत असल्यामुळे व एकाच वेळी होणारी कामगारांची गर्दी ज्या उद्योग/ कारखान्यामध्ये कामगार काम करीत असतील अशा उद्योग व्यवसायिकांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या कामगारांचे व त्यांचे कुटूंबातील इतर व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. ज्या कामगारांचे अथवा त्यांचे परिवारातील व्यक्तींनी लसीकरण केले नाही अशा कामगारांना दि.१४पर्यंत लसिकरण करुन घेणे बाबत व तसे प्रमाणपत्र सादर करणे बाबत सूचित करण्यात यावे.
५) कार्यालय प्रमुख – सर्व कार्यालयातील कामकाज पूर्णपणे सुरु झाले असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय, संस्था यांनी त्यांचे कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व त्यांचे घरातील व्यक्ती यांनी लसीकरण करुन घेतले असल्याबाबत त्यांचेकडून हमीपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापपावेतो लसीकरण केले नसल्यास त्यांना दि.१४ पर्यंत लसिकरण करुन घेणे बाबत निर्देशित करावे.
६) सर्व बॅंकेचे व्यवस्थापक – बॅंक व्यवस्थापनाशी निगडीत सर्व कर्मचारी वृंद यांनी यांनी त्यांचे बॅंकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व त्यांचे घरातील व्यक्ती यांनी लसीकरण करुन घेतले असल्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापपावेतो लसीकरण केले नसल्यास त्यांना दि.१४ पर्यंत लसिकरण करुन घेणे बाबत निर्देशित करावे.
विशेष लसिकरण मोहिमेच्या कालावधीत प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने प्रशासनातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक-माध्यमिक). गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसिलदार यांनाही यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आले आहेत.