मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ माजलेली असतानाच दुसरीकडे डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचलनालयाने मुंबईतून 25 किलो हेरॉईन ड्रग जप्त केलं आहे. मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. शेंगदाणा तेलाच्या कंटेनरमधून हे ड्रग मुंबईला आणलं होतं. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून ड्रग जप्त केलं आहे.
पोलिसांना ड्रग न्हावा शेवा बंदरावर येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकल्यानंतर शेंगदाणा तेलाच्या कंटेनरमधून ड्रग्ज आणल्याचं समोर आलं. डीआरआयडीने याप्रकरणी नवी मुंबईतील जयेश सांघवी या व्यापाऱ्याला अटक केली आहे. हे 25 किलो हेरॉईन इराणवरून आणल्याची माहिती आहे. या ड्रगची बाजारातील किंमत 125 कोटी रूपये इतकी आहे.
डीआरडीआयने सांघवीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांघवी याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर नार्कोटीक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबटन्स या अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रग्ज आणलेला कंटेनर हा सांघवीचा पार्टनर संदीप ठक्कर याचा होता. परंतू, त्यालाही या प्रकरणाबद्दल काही माहित नव्हतं. सांघवी याने त्याला त्याच्या फर्मसाठी इराणमधून वस्तू आणायच्या आहेत, असं सांगून कंटेनर घेतला होता. अशी माहिती डिआरडीआयला संदीपकडून मिळाली आहे. डीआरडीआय टीम मुंबई बंदरावर थांबून पुढील प्रकरणाचा तपास करत आहे.