मुंबई ते गोवा दरम्यान जाणाऱ्या क्रूझमधील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर हे प्रकरण हायप्रोफाईल झाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रूझवरील टाकलेल्या छाप्यावरून विविध आरोप केले. त्यांनी असा दावा केला की, “क्रूझमध्ये ड्रग्ज सापडलेच नाही.” यावरून एनसीबीचे जनरल डायरेक्टर समीर वानखेडे माध्यमांशी संवाद साधला. या ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे काय म्हणाले, ते पाहू…
समीर वानखेडे म्हणतात, “आम्ही औपचारिक पत्रकार परिषद केलेली आहे. तरीही आम्ही तुम्हाला सांगतो की, आम्ही ९ जणांची नावे दिली आहेत, ज्यांचा पंचनामा झाला आहे. या प्रकरणातील प्रत्येक कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आलेली आहे.”
केवळ सेलेब्रिटी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांनाच तुम्ही अटक करता. त्यामुळे तुम्हाला पोस्टर बाॅय संबोधले जात आहे, यावर समीर वानखेडे म्हणाले की, “मी पोस्टर बाॅय नाही आणि मी या गोष्टीवर विश्वासही ठेवत नाही. आम्ही सर्व सरकारी कर्मचारी आहोत. आम्ही आमचं काम करत आहोत.”
“एनसीबी ही एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. जी कुणी व्यक्ती एनडीपीएस नियमांचे उल्लंघन करत आहे, त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि पुढेही करत राहणार. मागील वर्षी मुंबई आणि महाराष्ट्रभर ड्रग्ज फ्री वातावरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकडेवारी त्याची साक्ष देतात.”
“एका वर्षात ३२० लोकांना आम्ही अटक केलेली आहे. २ मोठ्या ड्रग्ज फॅक्टरी पकडण्यात आल्या. कित्येक ड्रग सिंटिकेट आणि गॅंग पकडण्यात आल्या आहेत. आकडेवारी आमच्या कामाची साक्ष देते. एका वर्षात १०० करोडपेक्षा जास्त किमतीची ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत. पुढेही आम्ही असेच काम करत राहू”, असेही त्यांनी माध्यमांना ठामपणे सांगितले.
आर्यन खानच्या अटकेवरून सर्वत्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुम्हाला त्याच्या संदर्भात काही पुरावे सापडले आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना समीर नावखेडे म्हणाले की, “हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. आम्ही कोर्टात सर्व पुरावे दिले आहेत. पुढेही दिले जातील. या प्रकरणात १६ लोकांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडे विविध प्रकराचे ड्रग्ज सापडलेले आहेत.
आर्यन खानच्या अटकेवरून राजकारण केलं जातंय का? नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत, त्यामुळे तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, “या प्रश्नावर मी काही बोलणार नाही. पण, आम्ही एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहोत. कोणत्या एका व्यक्तीला टार्गेट म्हणून कारवाई करत नाहीत. पण, जो एनडीपीएस नियम तोडतो, त्याच्यावर आवाज कारवाई केली जाते.”