अकोला: दि.६: अश्ववर्गीय प्राणी (घोडे, गाढव, खेचर इ.) यांना ग्लॅंडर्स हा संसर्ग आजार होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय कृषी अनुसंधान परिषद अश्वअनुसंधान केंद्र हिसार, तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. ग्लॅंडर्स हा आजार अश्ववर्गीय जनावरांना होतो.
त्यांच्यापासून तो मानवासही होतो. मानवासाठी हा आजार प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या तसेच जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे अश्ववर्गीय प्रजातीच्या प्राण्यांचा बाजार, शर्यती, जत्रा, पशुप्रदर्शन, लग्न समारंभ इ. ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशा स्पष्ट करण्यात आले आहे.