नवी दिल्ली: निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता लवकरच संपणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) एक नवीन पेन्शन योजना आणण्याची तयारी करत आहे. या माध्यमातून वयाच्या 60 वर्षानंतर एक निश्चित पेन्शन मिळेल. या योजनेमध्ये निश्चित परताव्याची हमी दिली जाईल. प्रत्येकजण नवीन पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
सीएनबीसी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नवीन पेन्शन योजना पुढील सहा ते आठ महिन्यांत सुरू केली जाऊ शकते. शेअर बाजारातील अस्थिरतेची पर्वा न करता या योजनेला निश्चित परतावा मिळेल. पीएफआरडीए नवीन योजनेसाठी प्रयत्न करत आहे आणि अनेक कंपन्यांशी चर्चाही करत आहे.
दोन-तीन कंपन्यांनी या पेन्शन योजनेमध्ये प्रचंड रस दाखवला आहे. प्रत्येकजण नवीन पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकेल. खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य माणूसही यात गुंतवणूक करू शकेल.
अटल पेन्शन योजना आणि NPS योजना स्वतंत्र होणार
नवीन पेन्शन योजना अटल पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) पेक्षा वेगळी असेल. योजनेमध्ये लॉक इन पीरियडची तरतूद असेल. तुम्हाला निश्चित परताव्यासाठी ठराविक कालावधीसाठी त्यात गुंतवणूक करावी लागेल.
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि प्रत्येकवर्षी मिळवा 1.1 लाख रुपये
गेल्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आला आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांचे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे त्यांचे पेन्शन. अशा परिस्थितीत सरकार चालवत असलेली वय वंदना योजना ही त्यांच्यासाठी एक आकर्षक पर्याय असल्याचे समोर आलं आहे.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर योजनेतंर्गत वर्षाला 1,11,000 रुपये मिळवू शकता. मोदी सरकारने या योजनेचा कालावधी आणखी वाढवला आहे. यापूर्वी अंतिम मुदत 31 मार्च 2020 होती. मात्र, ही मुदत 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट आणि निवृत्ती वेतन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक व्याज मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या योजनेच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. सध्या या योजनेचा व्याजदर आठ टक्क्यांवरून घसरुन 7.4 टक्क्यांवर आला आहे. तर, वार्षिक निवृत्ती वेतनाची पर्याय निवड केल्यास 7.66 टक्के वार्षिक परतावा मिळेल.