हिवरखेड(धीरज बजाज): एखादया गावाचे क्षेत्र आणि लोकसंख्या वाढत असल्यास लोकसंख्या 10,000 च्या वर झाल्यास नियमानुसार त्या गावाला शहराचा म्हणजेच नागरी क्षेत्राचा दर्जा दिला जात असतो. एखाद्या मोठ्या शहराच्या नजीकच्या खेड्यांना त्या शहराच्या हद्दवाढ मध्ये सुद्धा घेतात. पण याऊलट हिवरखेड रुपराव येथे कृतीनुसार हास्यास्पद पण विकासाच्या दृष्टीने संतापजनक प्रकार पहावयास मिळतो.
हिवरखेड गावाची वास्तविक लोकसंख्या 40,000 च्या वर असून येथे 18,000 सुजान मतदार आहेत. मागील 22 वर्षांपासून नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी गावकरी संघर्षरत आहेत. मागणीप्रमाणे शासनाने नगर पंचायत करणे अपेक्षित असताना उलट चक्र फिरवीत मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकापूर्वी हिवरखेडचे लचके तोडून वार्ड क्रमांक पाच हा तळेगाव जि प सर्कल ला जोडण्यात आला. कोणतीही प्रभाग रचना करताना शासनाकडून आक्षेप व हरकती बोलावण्यात येतात परंतु हिवरखेड चे लचके तोडण्यात येऊ नये यासाठी त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षानी अथवा लोकप्रतिनिधींनी अथवा स्वयंघोषित नेत्यांनी याला लिखित स्वरूपात कडाडून विरोध केला नाही अशी माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या नावाखाली वॉर्ड क्र 5 खेड्याला जोडल्या गेला. त्यामुळे जनता तथाकथित जागतिक दर्जाचा विकास आता अनुभवत आहे.
दुसरीकडे ऑगस्ट महिन्यातील वादग्रस्त व तहकूब झालेल्या ग्रामसभेत वेळेवर येणारे विषयात एका अर्जावरून थेट हिवरखेड गावाची फाळणी करून दोन ग्रामपंचायती कराव्या पन नगरपंचायत करू नये असा अफलातून ठराव हिवरखेड ग्रामपंचायतने घेतला व गावाची फाडनी करून दोन ग्रामपंचायती करण्याचा तो अफलातून ठराव दोनच दिवसात थेट नगर विकास मंत्रालयाच्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद करण्यात आला यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या.
त्यामुळे स्वतःच्या स्वार्थापोटी हिवरखेड चे आणखी किती लचके तोडणार? असा प्रश्न जनतेच्या मनात खदखदत असून हिवरखेड ची काही जनता 5 ऑक्टोबर रोजी हिवरखेड पंचायत समिती भाग एक करीता मतदान करेल तर हिवरखेड वार्ड क्र 5 ची जनता तळेगाव जि प सर्कल साठी मतदान करेल. पण हिवरखेड ची जनता महात्मा गांधीजीच्या विचारावर चालणारी आणि शांतता प्रिय असल्याने त्याचा गैरफायदा तर काही स्वार्थी लोक घेत नाहीत ना? ही बाब या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे.
यानिमित्ताने अजब स्वार्थ की गजब कहानी असे बोल नागरिकांच्या तोंडून निघत आहेत.