अकोला दि.३० : मुलींच्या जन्माचे स्वागत करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. मुलींना समानतेची वागणूक मिळावी यासाठी लिंगभेदा विरोधात जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. या मोहिमेत नागरिकांनीही सहभाग व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सभागृहात कन्यादिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार–वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ. साधवानी, मनपाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, शुभांगी ठाकरे आदी उपस्थित होते.
कन्यादिन उत्सव कार्यक्रमात सौरभ कटीयार म्हणाले की, समाजात होत असलेले गर्भावस्थेतील लिंग निदानाचे प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनाना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कडक कार्यवाही करा. आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यातच कोरोना काळात महिला डॉक्टर व नर्सने केलेले कार्य असाधारण आहे. आज जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय पदाचा धुरा महिलाच्या हातात आहे. ही अभिमानाची बाब आहे, असे गौरोवद्गार त्यांनी व्यक्त केले.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे(लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवावी. याकरीता स्टिंग ऑपरेशन, सोनोग्राफी सेंटर्सची अचानक तपासणी व जनजागृती अभियान यासारखे उपक्रम राबविण्याचे सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमात सुरुवातीला नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी गर्भजल लिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील माता व नवजात बालिकांना बेबी किट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनिषा बंड तर आभार प्रदर्शन नम्रता हुमने यांनी केले.