अकोला: दि.30: केंद्र शासनाव्दारे असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ‘ई-श्रम पोर्टल’ची सुरुवात करण्यात आली आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामागारांकरिता सामाजीक सुरक्षा योजना अंमलात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर.बी. हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक कै.जा.सोळंके, महिला व बाल विकास विभागाचे समुपदेशक सचिन घाटे, महानगरपालिकेचे प्रतिनिधी संगिता ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच असंघटित क्षेत्रातील विडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, विटभट्टी कामगार, भाजी व फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजीक सुरक्षितता पुरविण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. याकरीता शासनाने ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले आहे.
नोंदणीकरीता पात्रता: असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली कोणतीही बँक), सक्रिय मोबाईल नंबर (ओटीपीकरीता स्वत:चा अथवा कुटूंबातील अन्य व्यक्तीचा), स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
असंघटित कामगारांनी ई-श्रम पार्टलवर नोंदणी स्वत:, नागरी सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्रावर किंवा eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन 14434 व टोल फ्री 18001374150 क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी कामगार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.