शहाजी पवार: लातूर : किलारी भूकंप झाल्याने जीवनात अंधार आणला. वर्षानुवर्ष राबून कमावलेले, उभारलेले सारे काही सेकंदात मातीमोल झाले. जीवाभावाची माणसे गेली. भूकंपग्रस्तांना सरकारने, घरे बांधून दिली, पण, त्याचा दर्जा निकृष्ट ठरला. ही घरे कृषी संस्कृतीला पूरक नव्हती. परिणामी आज भूकंपग्रस्त भितीच्या छायेत आणि भूतकाळातील जखमा कुरवाळत बसले आहे. त्यामुळे किलारी भुकंपाला २८ वर्षं झाली तरीही ती भीती आजही कायम आहे.
३० सप्टेंबर १९९३ साली भूकंपातून वाचलेल्यांना निवारा देण्यासाठी तत्कालिन सरकारने घरे बांधून दिली. त्यावेळी औसा अन् उमरगा तालुक्यात ५५ हजार घरे बांधण्यात आली. घरे दिल्याने सरकारला कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला. पण, घरात राहण्याचे समाधान कुटुंब प्रमुखाला अन् त्याच्या कुटुंबाला मिळाली लाभले नाही. वास्तवाचा विचार न करता अन् गावकऱ्यांच्या गरजा विचारात न घेता घाईगडबडीत झालेले हे पुनर्वसन भूकंपग्रस्तासाठी नित्याची डोकेदुखी झाली आहे.
घरापुढे ओटा, घरासमोर अंगण, घरामागे परस, बैठकीसाठी ढेळज, धान्यासाठी लादणी, गुरासांठी गोठा, राहण्यासाठी खोल्या, अशी कृषी संस्कृतीला पूरक घर भूकंपग्रस्तांना अपेक्षित होती. पण, याचा विचारच सरकारने केला नाही. अनेक ठिकाणी आयत्या तयार भिंती उभारुन आणि आयत्या तयार छत टाकून घरे उभारली गेली. गुबाळला तर इग्लूसारखी घुमटाकार घरे बांधण्यात आली. या घरांना फडताळे नाहीत, उन्हाळ्यात उकाडा अन हिवाळ्यात गारठा असह्य होतो.
लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये कुत्री-डूकरांचा वावर आहे. अतिक्रमणही झाले आहे. रस्त्यांनी धड चालता येत नाही. भूकंप वेधशाळा, वृद्धाश्रम, वाचनालयाच्या इमारती धूळ खात पडून आहेत. त्या इमारतीत अवैद्य कृत्यांना ऊत आला आहे. घराचे कबाले अन कबाले अनेकांना मिळाले नाहीत. पुनर्वसनासाठी जमिनी देऊनही किलारी भूकंप ग्रस्तांचे प्रमाणपत्र अनेकांना मिळाले नाहीत. कार्यालयांनी खेटे मारुन थकलेल्या तरुणांनी नैराश्योपोटी व्यसनाला जवळ केल्याने दारू, मटका, गुटखा विक्री प्रचंड प्रमाणात वाढली आहे.