अकोला : देशभर कार्यरत असलेल्या १५ हजार ४२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कौशल्य प्रशिक्षण व विकासाकरिता उल्लेखनिय कामगिरी करणारे अकोला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निदेशक तथा ‘आम्ही अकोलेकर’ ग्रुपचे सदस्य मंगेस पुंडकर यांना केंद्र सरकारने कौशलाचार्य पुरस्कार देवून गौरविले आहे. आभासी पद्धतीने झालेल्या पुरस्कार वितरणात त्यांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात आला. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी अकोलेकर निदेशकाची निवड झाल्याबद्दल त्यांचा मंगळवारी ‘आम्ही अकोलेकर’ ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.
केंद्र सरकारने कुशल कारागिर निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास योजना प्रशिक्षणावर भर दिला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या मंत्रालयातर्फे सन २०१९ पासून दरवर्षी शिक्षक दिनाचे निमित्ताने भारत सरकार कौशलाचार्य राष्ट्रीय अवार्ड’ दिला जातो. त्यासाठी विभाग स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मूल्यांकन केले जाते. यात अकोलेकर व महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब म्हणजे सन २०२१ च्या पुरस्कारासाठी अकोला आयटीआयचे निदेशक मंगेश पुंडकर यांच्या कार्याचे मूल्यांकन राष्ट्रीय पातळीवर होऊन त्यांना कौशलाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेले ता. १७ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या पुरस्काराचे वितरण केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, मंत्र्यालयाचे केंद्रीय सचिव रवी मित्तल, अतिरिक्त सचिव अतुल तिवारी, डीजीटी महानिदेशक नीलम शमी राव आदींच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती आम्ही अकोलेकरतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मंगेश पुंडकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अविनाश नाकट, सुनील जानोकर, ॲड. संतोष गावंडे, पूजा काळे आदीसंह इतर सदस्य उपस्थित होते.
तीन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन
केंद्र सरकारच्या पुरस्कारासाठी निवड झालेले मंगेश पुंडकर यांनी गेले तीन वर्षांत कौशल्य विकाससाठी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तीन वर्षातील त्यांच्या विद्यार्थ्यांचे निकालाची टक्केवारी, विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम, विविध अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, प्रशिक्षणात नाविन्यपूर्ण संकल्पना व दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर, प्रभावी प्रशिक्ष्षण साहित्याची निर्मिती, कौशल्य विकासाकरिता नाविन्यपूर्ण कार्य, कोविड काळातील योगदान आदी कामगिरीचे मूल्यमापन करीत त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.