अकोला दि.२८: जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात २५.१ मिमि इतके पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात जवळपास सर्वच नद्या नाल्यांमधुन पूर्ण क्षमतेने पाणी वाहत असून गेल्या २४ तासात कोणतीही आपत्तीजनक स्थिती निर्माण झालेली नाही. तथापि, प्रशासकीय यंत्रणा सज्ज व सतर्क असून आवश्यकतेनुसार आपत्ती व्यवस्थापन तसेच शोध बचाव कार्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.
जिल्ह्यात अकोला तालुक्यातील अकोला ते अकोट हा रस्ता सुरु आहे, तसेच अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्गही सुरु आहे. तालुक्यातील सर्व नद्यांना व नाल्यांना पूर आहे. बार्शी टाकळी तालुक्यातही पुरस्थिती आहे, मात्र कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ३५२.८२ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दगड पारवा प्रकल्पातून २.०५ क्युमेक विसर्ग होत आहे. मोर्णा तसेच काटेपूर्णा नदीला पूर आहे. अकोट तालुक्यात सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. पोपटखेड प्रकल्पातून ९३.२२ क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तेल्हारा तालुक्यात वान प्रकल्पात पाण्याची आवक पाहून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो असे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. बाळापूर तालुक्यातही मन प्रकल्पातून १२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पातुर तालुक्यात कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. मोर्णा प्रकल्पातून ३९.४६ तर निर्गुणा प्रकल्पातून १३.४१ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मुर्तिजापुर तालुक्यातील उमा प्रकल्पातून ७८.६४ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
जिल्ह्यात पुरस्थिती असली तरी कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन कृती दल व शोध बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.