अकोला दि.२८: कै वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी(प्रभारी) सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये, उपवनसंरक्षक के. अर्जुना, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा उपनिबंधक कहाळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील गौण खनिज बाबत, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, कृषी विभागाच्या योजना, खावटी अनुदान योजना, कामगार विभागाच्या योजना, निराधारांना द्यावयाच्या अनुदानाच्या योजना, आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला.
श्री.तिवारी यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यासाठी त्यांचे पीक विमा संरक्षणाचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. तसेच घेतलेल्या पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात अन्न धान्य वितरणाचा लाभ गोरगरिबांना दिला जातो, त्यासोबतच अंत्योदय योजनेसारख्या योजनांचे लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये,असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना काळात झालेल्या औषध खरेदी तसेच गरीब रुग्णांना योजनांचा लाभ देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. कामगार नोंदणी व त्यानंतर योजनांचा लाभ हा गरीब कामगाराला मिळावा यासाठी यंत्रणेने काम करावे,असेही त्यांनी सांगितले.