तुम्ही आजपर्यंत अनेकदा लोकांना एकमेकांचा बदला घेताना पाहिलं असेल. एखाद्यानं आपल्यासोबत काही वाईट केलं की माणूस आपल्या पद्धतीनं बदला घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आजपर्यंत तुम्ही कधी कुठल्या प्राण्याला बदला घेताना पाहिलंय का? मात्र, नुकतंच एक माकड सध्या याच गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. या माकडानं केलेलं कृत्य ऐकून सगळेच हैराण झाले . सोशल मीडियावर सध्या या बदला घेणाऱ्या माकडाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) चिकमगलूर जिल्ह्यातील कोट्टिघेरा गावातील आहे. या गावात मागील काही दिवसांपासून एका माकडानं चांगलाच गोंधळ घातला होता. यामुळे लोकांच्या मनात या माकडाची दहशत निर्माण झाली होती. माकडाला पकडण्यासाठी गावात राहणाऱ्या जगदीश नावाच्या रिक्षाचालकानं वनविभागाला माहिती दिली. यानंतर जगदीशने माकडाला पकडण्यातही मदत केली. माकड पकडलं गेलं पण त्या माकडानं या व्यक्तीला लक्षात ठेवलं. जंगलात सोडल्यानंतर एका आठवड्यानं हे माकड परत गावात आलं. तेही, आपल्याला पकडून देणाऱ्या जगदीशचा बदला घेण्यासाठी आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचं हे माकड बोनेट मॅकक्वे प्रजातीचं होतं. हे माकड गावात येणा-जाणाऱ्या लोकांवर हल्ला करत असे. कोणी काही खाताना दिसलं की हे माकड त्यांच्या हातात ते हिसकावून घेत. भाजीपाला आणि फळ विक्रेतेही त्रस्त झाले होते. हे माकड गावातील लहान मुलांनाही त्रास देत होतं. याच कारणामुळे गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकानं या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाला फोन केला. यानंतर टीम तिथे आली आणि माकडाला पकडून घेऊन गेली.
वनविभागाला माहिती देणाऱ्या जगदिश रिक्षाचालकानं माकड पकडण्यातही मदत केली. वनविभागाच्या टीमनं या माकडाला पकडून जंगलात सोडलं. यात माकडानं तो रिक्षाचालक लक्षात ठेवला. एक आठवडा गावात शांती होती मात्र यानंतर माकड परत आलं. यावेळी त्यानं इतर कोणालाही काही त्रास दिला नाही. यावेळी त्याच्या निशाण्यावर केवळ रिक्षाचालक होता. रिक्षाचालक जिथे जाईल तिथे हे माकड त्याच्या मागेच जात. माकडानं अनेकदा त्याच्यावर हल्लाही केला. त्याच्या रिक्षाची सीट फाडली. माकडाच्या भीतीनं हा व्यक्ती घरातून बाहेरही पडू शकत नव्हता. यानंतर वनविभागाला पुन्हा याची माहिती देण्यात आली आणि २२ सप्टेंबरला या माकडाला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं.
या घटनेनंतर अॅनिमल एक्सपर्टही हैराण झाले. याआधी असं प्रकरण कधीच पाहिलं गेलं नव्हतं. माकड किंवा इतर कोणताही प्राणी आपला बदला घेण्यासाठी २२ किलोमीटर अंतर पार करून येणं हे एक अनोखं प्रकरण आहे. एक्सपर्ट सध्या याचा तपास करत आहेत. प्राण्यांच्या वागण्यात आलेल्या या बदलावर अभ्यास केला जात आहे.