अकोला: दि.२७: आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडु घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडुंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
खेळांमध्ये खेळाडुंची दर्जेदार कामगिरी व्हावी यासाठी मुलांना लहान वयातच क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील डायव्हिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी व वेटलिफटींग या खेळाच्या प्रवेशाकरीता मंगळवार दि.५ ते शुक्रवार दि.८ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे फक्त मुलांकरीता जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या चाचण्यांचे वेळापत्रक या प्रमाणे
वयोगट १० ते १४ वर्षे (जन्मदिनांक १/१/२००८ ते १/१/२०१२ दरम्यान असावा). क्रीडाप्रकार- बॉक्सिंग दि.५ ऑक्टोबर, कुस्ती, दि.६ ऑक्टोबर, ॲथेलेटिक्स दि. ७ ऑक्टोबर, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग व डायव्हिंग (जन्मदिनांक १/१/२०१० ते १/१/२०१४ दरम्यान असावा) दि. ८ ऑक्टोबर.
क्रीडाप्रकार निहाय मुल्यांकन तक्त्यानुसार किमान ८० टक्के गुण प्राप्त करणारे खेळाडु पुढील चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक खेळाडुंनी आधारकार्ड /जन्माचा दाखला सादर करुन आपल्या नावाची नोंदणी दि.१ ऑक्टोबर पर्यंत करावी व खेळनिहाय चाचणीसाठी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी दहा वा. जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे उपस्थित राहावे.कोवीड १९ कालावधी विचारात घेता खेळाडुंनी मास्क, सॅनिटायझर, वॉटर बॅग इत्यादी साहित्य सोबत आणावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.