मुंबई: घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा तर 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा अखेर सरकारचा निर्णय झाला आहे.
येत्या 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला.
मुख्यमंत्री म्हणाले, भक्तांची गर्दी रोखण्याची जबाबदारी मंदिर व्यवस्थापनावर राहील. कोरोनाच्या रुग्णसंख्येत उतार असला तरी सावध राहावे लागेल. सर्व प्रार्थनास्थळांवर आरोग्याचे नियम पाळावे लागतील. मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर झालाच पाहिजे.
जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटविण्यास सुरुवात करताना राज्य सरकारने मंदिरे व इतर धार्मिक स्थळे मात्र बंदच ठेवली. त्यामुळे मंदिरे उघडा, असा घंटानाद, शंखनाद सुरू झाला. भाजप, मनसेने आंदोलन केले. तरीही देऊळबंदच्या निर्णयावर सरकार ठाम राहिले. गणेशोत्सवावरदेखील कडक निर्बंध लादण्यात आले. आता गणपतीनंतरही राज्यात सध्या रोज तीन ते साडेतीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. दुसर्या लाटेचा हा नीचांकी स्तर मानला जातोे. तिसरी लाट येणार म्हणून जे मुहूर्त सांगितले गेले ते महाराष्ट्राने चुकीचे ठरवले. त्यात लसीकरणाचाही मोठा वाटा आहे. 8 कोटी 60 लाख नागरिकांना डोस दिल्याने प्रतिकारशक्ती निर्माण झाली. संसर्ग दर घटला. त्यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच घटस्थापनेला 7 ऑक्टोबरपासून सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला.
४ ऑक्टोबरपासून शाळा होणार सुरू
येत्या 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केली. कोरोना टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली, असे त्या म्हणाल्या.
शाळा सुरू होणार ही विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदवार्ता असली तरी शाळा सुरू करण्यासाठी घातलेल्या अटी आणि शर्ती पाहता मुलांना घरीच ठेवलेले बरे असा विचार करण्याची वेळ पालकांवर येईल अशी स्थिती आहे.
शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल. या मंजुरीसाठी पालकांना सक्ती करू नये, असे आदेश शाळांना दिले जातील. प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे आवश्यक, विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जाईल, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. त्यासाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा. शाळा सुरू होणार असल्या तरी गृहपाठ मात्र एक तर वर्गातच करून घ्यावा किंवा ऑनलाईन घ्यावा लागेल. पुस्तकांची अदलाबदल टाळण्यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छ्वास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलट्या जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात येताच त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था शाळांना करावी लागेल.
- मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे
- स्कूलबस – खासगी वाहनातून एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घ्यावी.
- विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना सॅनिटायझरचा वापर आवश्यक.
- सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
- खो-खो, कबड्डी इत्यादी टाळावे. क्रिकेट, शारीरिक शिक्षणास परवानगी. मात्र, मास्क व 2 मीटर अंतर राखणे आवश्यक.
शाळांच्या निर्णयावर स्वागत आणि चिंताही
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून पालक वर्ग तसेच शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे; तर काही ठिकाणी अजूनही कोरोनामुळे आरोग्याची चिंता व्यक्त करत पूर्ण लसीकरणाची मागणी होत आहे. गेल्या दीड वर्षापासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणापासून वंचित राहून बालमजुरी करणार्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येणार असल्याने या बालकांसाठी काम करत असलेल्या संस्थांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर ग्रामीण भागातील शिक्षकांनी शाळा पहिलीपासून सुरू कराव्यात, अशीही मागणी करत पायाभूत सुविधांची मागणी केली आहे