अकोला: दि.२१: जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत आज जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. उद्योजकांना उद्योग चालविण्यासाठी येणाऱ्या स्थानिक पातळीवरील समस्या संबंधित विभागाने व अन्य विभागांनी आपापसात समन्वय साधून सोडवाव्या, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, सहायक आयुक्त कामगार विभाग राजू गुल्हाने, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए.बी. दाबेराव, अपर अधिक्षक अभियंता गणेश महाजन, एमएसईसीबीचे कार्यकारी अभियंता अ.की. कराळे, सहायक राज्यकर आयुक्त आ.आर. देशमुख, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
आढावा बैठकीत जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या. त्यात एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट व सिसीटीव्ही लावणे, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या तातडीने मार्गी लावाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,असे निर्देश संबंधितांना दिले.