शिर्डी (जि.अहमदनगर) : कितीही श्रीमंती आणि सुबत्ता असू द्या; शेतकऱ्याच्या घरात मुलगी द्यायला शेतकरीच नकार देतात. खेड्यातील मुलींना शहरातील मुलगा हवा असतो. शहरातील मुलींना खेडे कधीच आपले वाटत नाही. शेती आणि शेतकऱ्यांच्या या शोकांतिकेवर नांदगाव तालुक्यातील योगेश आहेर या तरुण शेतकरीपुत्राने उत्तर शोधले.
‘शेतकरी नवरा नको’ला शेतकरीपुत्राचे सणसणीत उत्तर! पंचक्रोशीत कौतुक
योगेश यांच्या घरची आठ एकर बागायत शेती. दहा-बारा संकरित गायी आणि रोज शंभर लिटर दूध डेअरीला जाते. ज्या शेतीवर आहेर कुटुंबाने आपली ओळख निर्माण करीत आर्थिक प्रगती केली, तीच शेती योगेश यांचे लग्न जुळविताना आड येऊ लागली. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांची मुलं शहरात कामासाठी जातात. त्यांच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात. शेतकऱ्यांना आपल्या मुली शेतकऱ्यांच्या घरात द्याव्याशा वाटत नाहीत. मग शेतकऱ्यांच्या मुलांचे कसे होणार, हा मोठा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. मला असेच दाहक अनुभव आले. त्यामुळे मी असा निर्णय घेतला.
अनाथ महेश्वरीला मिळणार मायेची ऊब! शेतकरीपुत्र बांधणार रेशीमगाठ
एका अनाथालयात अनाथ मुलगी ‘महेश्वरी’ लहानाची मोठी झाली, त्या साई आश्रया परिवाराचे प्रमुख गणेश दळवी म्हणाले, की साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळला. आम्ही महेश्वरीची पसंती लक्षात घेतली. तिला आई-वडील नाहीत. संस्कारित मुलगी आहे. तिचे कल्याण झाले. त्याने येथील साई आश्रया अनाथालयातील महेश्वरी या अनाथ मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या मध्यस्थीने या दोघांची रेशीमगाठ जुळली. आज (ता. १६) हे दोघे साईबाबांच्या नगरीत विवाहबद्ध होत आहेत.
योगेश आहेर हा होतकरू तरुण शेतकरी आहे. साई आश्रया परिवारात वाढलेल्या महेश्वरीशी त्याचा विवाह जुळविण्यात मला यश आले. मात्र, या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मुलांसमोरील विवाहाची कठीण समस्यादेखील समोर आली. या समस्येवर विविध पातळ्यांवर मंथन होऊन मार्ग काढायला हवा. – सचिन तांबे, माजी विश्वस्त, साईसंस्थान, शिर्डी
आजवर येथील अनाथ सहा मुलींचे विवाह झाले. त्या सर्व जणी सुखाने नांदत आहेत. पस्तीस ते चाळीस वर्षे वयाच्या मुलांसाठी मुली मिळतील का, अशी विचारणा करणारे शेतकरी आमच्याकडे येतात त्यावेळी फार वाईट वाटते. घरची परिस्थिती चांगली असतानाही शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत, हे वास्तव फार क्लेशदायी आहे. – गणेश दळवी, प्रमुख, साई आश्रया परिवार, शिर्डी