नवी दिल्ली: दोन कोटी लसीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवस भाजपकडून ‘सेवा समर्पण’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दोन कोटी लसीकरण टप्पा गाठण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. या अनुषंगाने देशातील विविध ठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामुळे अवघ्या ९ तासांमध्येच ५ वाजून ८ मिनिटांनी देशाने विक्रमी दोन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. देशाने यापूर्वी केलेला सर्वाधिक लसीकरणाचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. देशात यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक १ कोटी ३३ लाख लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आला होता. पंरतु, शुक्रवारी सहा तासांमध्ये दुपारी १.४० वाजता लसीकरणाने १ कोटींचा टप्पा ओलांडला. तर पुढील १०० मिनिटांमध्ये ३.२० वाजता लसीकरणाचा आकडा दीड कोटींवर पोहोचला. दुपारी चार वाजेपर्यंत १ कोटी ६५ लाखांहून अधिक डोस लावण्यात आले होते.
केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार दुपारी अडीच वाजतापर्यंत देशात दर तासाला १९ लाख डोस लावण्यात आले. तर, दर मिनिटांना ३१ हजार आणि दर सेंकदाला ५२७ डोस लावण्यात आले. २ कोटी लसीकरणाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी जवळपास एक लाख ठिकाणी लसीकरण अभियान राबवण्यात आले. दिवसभरात लसीकरणाचा आकडा उच्चांकी अडीच कोटींपर्यंत पोहचेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने आपलाच विक्रम मोडला आहे. भारताने लसीकरणात स्थापित केलेला १ कोटी ३३ लाखांचा विक्रम मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून देत देशवासियांना लसीकरणाचे आवाहन केले.
गेल्या दोन दशकांपासून पंतप्रधान घटनात्मक पदावर आरुढ आहेत. ७ ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यानंतर ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर आरूढ आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या.
देशात कोरोनाविरोधात सुरु असलेल्या अभियानाचा वेग लक्षात घेता लवकरच लसीकरणाचा आकडा १०० कोटींपर्यंत पोहचेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ऑक्टोबर मध्यापर्यंत देशात कोरोना लसींचे पहिला आणि दुसरा डोस मिळून १०० कोटी डोस लावले जातील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून सेवा आणि समर्पण अभियानाची सुरूवात केली. लोकसहभागाचा नवा अध्याय लिहला जात आहे. प्रत्येकांचा विकास करणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा उद्देश आहे.जनतेकरिता समर्पित भाव पंतप्रधानांचा स्वभाव आहे, असे प्रतीपादन नड्डा यांनी केले.