अकोला: दि.१७: जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ निवडणूक विभाग व पंचायत समितीचे २८ निर्वाचन गणात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत १ लाख ७७ हजार ७०० स्त्री, १ लाख ९४ हजार १९ पुरुष तर एक इतर असे एकुण ३ लाख ७१ हजार ७२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट ८१, मुर्तिजापुर ८३, अकोला ८५, बाळापूर ७४, बार्शी टाकळी ४९, पातुर ३९ असे एकुण ४८८ मतदान केंद्र असतील. तालुकानिहाय नियोजन करुन जिल्ह्यात ४४ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष व १८२१ मतदान अधिकारी असे २४२८ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात आले असून दि.२४ ते दि.३० या दरम्यान तालुकास्तरावर हे प्रशिक्षण होईल.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
यावेळी तालुकास्तरावर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, ईव्हीएम बद्दल जनजागृती करणे, उमेदवारांच्या खर्चाचा तपशिल गोळा करणे याबाबत उपस्थितांना सुचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा चार लक्ष तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा तीन लक्ष रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी (१४) ९५ उमेदवार तर पंचायत समिती गणासाठी(२८) १६१ नामनिर्देशित उमेदवार आहेत.
निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राबवावी. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.