अकोला: दि.१५ : प्रादेशीक हवामान केंद्र, नागपुर यांच्या कडून प्राप्त संदेशानुसार अकोला जिल्ह्यात दि.१५ ते २० सप्टेंबर दरम्यान हलका, मध्यम ते अधिक स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना सतर्कतेचा आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता दि.१९ रोजी असलेल्या गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात ९८.१ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात वान प्रकल्पात ९१.८५ टक्के, काटेपूर्णा ९८.५८ टक्के, मोर्णा ८६.६० टक्के, निर्गुणा १०० टक्के, उमा ७०.९४ टक्के, दगड पारवा ९४.०१ टक्के, पोपटखेड ९२.०६ टक्के या प्रमाणे जलसाठा झाला आहे. तसेच अन्य लहान मध्यम प्रकल्पांतहई जलसाठा जमा झाला आहे. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही दिवसांत अधिक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर नागरिकांनी खालील प्रमाणे दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशानाने केले आहे.
१. हवामान विभाग तसेच प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अधिकृत माध्यमांमधील सुचनांचे पालन करावे.
२. अचानक पूर येणारी क्षेत्रे उदा. नद्या, नाले, ओढे, ड्रेनेज, कॅनॉल इ. बाबत जागरुक रहावे.
३. विशिष्ट भागात पूर येण्याच्या शक्यतेबाबतही वेळोवेळी सूचित करण्यात येते त्याबाबत जागरुक रहावे.
४. पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. वाहनेही नेऊ नये.
५. पुराचे पाणी येण्याची शक्यता निर्माण झाल्यास जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.
६. जिल्ह्यात पुराच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील ठिकाणे याप्रमाणे-
अकोला तालुका- गांधीग्राम (पूर्णानदी), काटेपूर्णा नदी, कानशिवणी, कुरणखेड, अकोला एमआयडीसी परिसरातील खदानी.
बार्शी टाकळी तालुका- दोनद बु., दोनद खु.(काटेपूर्णा नदी), पुनोती तलाव.
अकोट तालुका- पोपटखेड प्रकल्प, केळीवेळी (पूर्णा नदी), वरुर (पठार नदी).
तेल्हारा तालुका- वांगेश्वर (पूर्णा नदी), भोकर (विद्रुपा नदी), मनब्दा (विद्रुपा नदी), तेल्हारा (गौतमा नदी).
बाळापूर तालुका- मन नदी, भिकुंड बंधारा, अंदुरा (पूर्णा नदी), बोरगाव वैराळे (पूर्णा नदी), निमकर्दा तलाव, पारस मन नदीवरील बंधारा.
पातुर तालुका- बोर्डी नदी, चौंढी येथील तलाव, विश्वमित्री नदी लघु प्रकल्प, गावंडगाव प्रकल्प.
मुर्तिजापूर तालुका– दुर्गवाडा (पूर्णा नदी), एंडली (पूर्णा नदी), पोही (उमा नदी), वाई प्रकल्प.
या सर्व संवेदनशील ठिकाणी गणेश विसर्जन करतांना गणेश भक्तांनी आवश्यक दक्षता घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.