अकोला: कोरोना काळात तसेच पावसाळ्यात साथीच्या रोगाची लागण होते. अशावेळी नागरिक उपचाराकरीता डॉक्टरकडे न जाता घरीच किंवा आपल्या सोईनुसार औषधी घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी देवू नये. यासंदर्भात अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, बुलडाणा येथील औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अशोक बरडे, अन्न सुरक्षा अधिकारी कोकडकर, वाकडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निर्देश दिले की, सणासुदीचे दिवस आहेत अशा उत्सव काळात भेसळ व रासायनिक प्रक्रिया केलेल्या मिठाई, फरसाण, खाद्य वस्तू विक्री केल्या जातात. अशा भेसळ करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी. खाद्यपदार्थाची नियमित तपासणी करुन भेसळ होत नसल्याची खात्री करावी. भेसळ करु नये याकरीता विक्रेतांची कार्यशाळा घेवून त्यांच्यात जनजागृती निर्माण करा. तसेच डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय रुग्णास औषधी दिल्या जावू नये. याची अंमलबजावणी प्राधान्याने होईल याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात गुटखा विक्री करण्याऱ्यावर तातडीने कार्यवाही करावी. याकरीता पथक निर्माण करुन जिल्हास्तरावर धाडसत्र राबवावे. यावेळी जिल्ह्यातील औषधी व ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता सर्तक राहून ऑक्सीजन व औषधीचा मुबलक साठा तयार ठेवावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.