अकोट: अकोला रेल्वे मार्ग पूर्ण होऊन मोठा कालावधी होऊनही मोठ्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत जाणीवपूर्वक या मार्गावर रेल्वे सेवा अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर असे की
उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात महत्त्वाचा रेल्वे मार्ग अकोला- अकोट- खंडवा- इंदोर मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मेळघाटातुन जाणारा आकोट हिवरखेड आमला खुर्द या मार्गाला विविध परवानग्या नसल्याने व हा मार्ग हिवरखेड पासून मेळघाट ऐवजी सोनाळा जळगाव जामोद मार्गाने वळविण्याची मागणी समोर आली होती त्यामुळे हा मार्ग कधी होईल आणि कोणत्या मार्गाने होईल याबाबत पेच अजूनही फसलेला आहे.
दुसरीकडे उशिरा का होईना पण अकोट अकोला ह्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन आता मोठा कालावधी उलटला आहे. या मार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी होऊनही अनेक महिने झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून तात्काळ रेल्वेसेवा सुरू होईल अशी भोळी आशा नागरिकांना होती. परंतु सुरुवातीला कोरोना निर्बंधांमुळे उशीर करण्यात आला तर आता अनेक महिन्यापासून अकोट रेल्वे स्टेशन तथा अकोट- अकोला रेल्वेमार्ग आणि प्रवाशी रेल्वेसेवा इत्यादींचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, अथवा केंद्र सरकारच्या अन्य मोठ्या वजनदार मंत्र्यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याने या रेल्वेसेवा आणि स्थानकाचे उद्घाटन रखडले असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या नांदेड डिव्हिजनच्या टाईम टेबल मध्ये काही महिन्यांपूर्वी अकोट अकोला पूर्णा ह्या डेमु रेल्वेचा टाईम सुद्धा जाहीर करण्यात आला होता. पण त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने मंत्री महोदयांची वेळ मिळू शकली नसल्यानेच अकोट पूर्णा रेल्वेसेवा अकोट ऐवजी पूर्णा ते अकोला पर्यंतच सुरू करण्यात आली होती अशी विश्वसनीय चर्चा आहे.
पण आता संसदेचे अधिवेशन होऊन बरेच दिवस झाल्याने अजूनही त्या मंत्री महोदययांची फुरसत झाली नाही का? मंत्री महोदयांच्या प्रतीक्षेत रेल्वे सेवा सुरू न करणे कितपत योग्य आहे? मागील दोन दिवसांपासून पुरामुळे अकोट अकोला यासह अनेक लहान मोठ्या शहरांचा रस्ते संपर्क तुटलेला असून अकोट अकोला पूर्णा रेल्वेसेवा सुरू असती तर प्रवाशांच्या हाल अपेष्टा कमी झाल्या नसत्या काय? उदघाटनाला प्रचंड विलंब होत असल्याने ही रेल्वेसेवा सुरू करणे मंत्री महोदयांच्या मते तुच्छ कार्य आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी चाचणीनंतर इतक्या महिने रेल्वेसेवा सुरू न केल्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला असेल त्याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात घोंगावत आहेत.
प्रतिक्रिया:-
अकोट वरून रेल्वेसेवा कधी सुरू होईल याबाबत शासकीय स्तरावरून कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही.
राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग.
अकोट, हिवरखेड सोबतच परिसरातील लाखो प्रवाशांच्या दृष्टीने अकोट येथून तात्काळ रेल्वेसेवा सुरू करणे गरजेचे आहे. मंत्री साहेबांना वेळ नसल्यास प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. अकोट वरून रेल्वेसेवा तात्काळ सुरू न केल्यास सामान्य जनतेलाच प्रतिकात्मक स्वरूपात उदघाटन करावे लागेल.
धिरज संतोष बजाज
संयोजक, हिवरखेड विकास मंच