नवी दिल्ली: पुढील वर्षीच्या सुरुवातीला सात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी पाच राज्यांसाठी भाजप पक्षाने बुधवारी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे सहप्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अर्जुनराम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंजदले, कॅप्टन अभिमन्यू, अन्नपूर्णादेवी आणि विवेक ठाकूर यांना नेमण्यात आले आहे.
गोवा राज्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मणिपूरची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्याकडे देण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या प्रभारी पदाची जबाबदारी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सहप्रभारी म्हणून लॉकेट चॅटर्जी अणि सरदार आर. पी. सिंग यांना नेमण्यात आले आहे.
पंजाबसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी सहप्रभारी म्हणून हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु…
आगामी मार्च-एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात यावेळी तुल्यबळ लढती होण्याची शक्यता आहे.
गत विधानसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. यावेळी विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. तर सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती यांनीही शड्डू ठोकला आहे. काँग्रेसने देखील आपले सारे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.