अकोला,दि.1– भारत कुपोषणमुक्त होण्यासाठी शासनाच्या विविध विभागामध्ये अभिसरण पद्धतीने राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. या महिण्यात दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोषणमाह मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.
राष्ट्रीय पोषण आहार मोहिमेची सुरुवात सन 2018 पासुन प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिण्यात साजरा करण्यात येतो. त्यानुसार चौथा राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर-2021 साजरा करण्यात येणार असुन जिल्ह्यात ग्रामिण भागातील एकुण 1403 अंगणवाडी केंद्र तसेच आठ प्रकल्पस्तरावर बालक व महिलांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन, बालकांची सविस्तर माहिती, कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करुन लसीकरण मोहिम राबविणे, गर्भवती महिलांकरीता स्पर्धा, त्यांच्या आहार व आरोग्यविषयक माहिती, पौष्टीक आहार, कुपोषणबाबतची माहिती व कारणे, बालक व गर्भवती महिलांकरीता असलेल्या योजनाची माहिती आदि उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पोषणमाह राबवितांना कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल, असे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.