नवी दिल्ली : 7th Pay Commission DA: लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते. सातव्या वेतन आयोगानुसार, या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) पुन्हा एकदा वाढू शकतो आणि तो ३१ टक्क्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार जून महिन्यासाठी महागाई भत्ता निश्चित करणार आहे. मात्र, अद्याप या संदर्भात सरकारकडून कोणतेही माहिती देण्यात आली नाही. ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या (AICPI) जूनच्या आकडेवारीनुसार जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. म्हणजेच महागाई भत्ता ३१ टक्के होऊ शकतो.
सध्या २८ टक्के महागाई भत्ता
दरम्यान, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सध्या २८ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. हा महागाई भत्ता त्याच्या जुलैच्या पगाराशी जोडला गेला आहे. कर्मचारी जून २०२१ च्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याच्या घोषणेची वाट पाहत आहेत. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली, तर त्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. सरकार लवकरच या संदर्भात घोषणा करू शकते.
गेल्या महिन्यात सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता आणि डीआरमध्ये १७ वरून २८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, या वाढीमुळे मागील नुकसानची भरपाई होईल. मात्र, सरकार थकबाकी देण्यास तयार नाही आहे.
तीन हप्त्यांना स्थगिती देण्यात आली होती
कोरोना संकटामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते गोठविण्यात आले होते. त्यानुसार १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ या तीन हप्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने हे तीनही हप्ते गोठविण्याचे ठरवले होते. कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता १ जानेवारी २०२० पासूनचे महागाई भत्ते देता येणार नाहीत, असे त्यावेळी सरकारने जाहीर केले होते. परंतु सरकारने म्हटले की १ जुलैपासून महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत केला जाईल. आता १ जून २०२१ च्या सहामाही हप्त्याबद्दलच्या निर्णयाची कर्मचारी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.