अकोला– बाळापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उत्तम मार्ग वाचनालयाच्या माध्यमातून आहे. वाचनालय हे वाचन संस्कृती निर्माण करतात, वाचनाने सुजाण नागरिक घडतात, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
बाळापूर येथील नगर परिषदेच्या ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण आज ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर, नगराध्यक्ष सैय्यद ऐनोद्दीन खतीब, विधान परिषद सदस्य आमदार किरणराव सरनाईक, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तेरानीया, उपनगराध्यक्ष राहुल तायडे, मुख्याधिकारी गोपीचंद पवार, जिल्हा परिषदचे सदस्य चंद्रशेखर चिंचोलकर, नगरसेवक अमजद हूसेन, अखली पंजाबी, किशोरसेठ गुजराती, माजी आमदार माणिकराव ठाकरे, डॉ. सुभाष कोरपे, सुधीर ढोणे, सैय्यद खतीब, नगरपरिषदचे सदस्य व नागरिक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा जास्त नुकसान केले असले तरी शासन व नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता गाफील न राहता दक्ष राहण्याचे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महिला बचत गटांना कर्ज मंजूरी पत्राचे वितरण
याच कार्यक्रमात बाळापूर नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांना विविध व्यवसायाकरीता सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बाळापूर शाखा यांच्यावतीने १७ महिला बचत गटांना मंजूर करण्यात आलेले ४४ लाख रुपयांचे मंजूरी पत्रांचे ना. बाळासाहेब थोरात व ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये या प्रमाणे कर्ज देण्यात येते. त्याअंतर्गत बाळापूर शहराला ५३५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्याअनुषंगाने बाळापूर नगरपरिषदेने निवड केलेल्या ५७४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव बॅंकेत सादर केले होते. त्यातील ३४१ कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ३२६ प्रस्ताव वाटप करण्यात आले आहे. त्यातील ३४ लक्ष रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यात स्थानिक स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचे २१८ तर सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यांचे १०५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आहेत. याच कर्ज मंजूरी पत्रांचे वितरण महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कर्ज मंजूरीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. नगरपरिषदेतील ग्रंथालय इमारतीमुळे शहरातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वाचनालयाचे लाभ होणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.