पुणे: पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उभारलेले मंदिर रातोरात हटविण्यात आले. थेट पंतप्रधान कार्यालायातून कानपिचक्या दिल्याने हे मंदिर हटविल्याची चर्चा आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाने या मंदिरासमोर उपहासात्मक आंदोलन करत पेट्रोल आणि डिझेलचा नैवेद्य दाखविण्यात आला. या मंदिरातील पुतळा हटविल्याने पोलिसांत तक्रारही देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
पुण्यातील औंध गावात उभारण्यात आलेल्या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. मात्र आता हा पुतळा हटवण्यात आला आहे.
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारले होते.
ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
या मंदिराची चर्चा बरीच झाली. या मंदिराची चर्चा थेट दिल्लीपर्यंत गेल्याने पक्षात काहींनी नाराजी व्यक्त केली.
भाजप नेतृत्त्वाने याची दखल घेत मुसळे यांना कानपिचक्या दिल्या.
त्यामुळे या मंदिरातील मोदींचा पुतळा हटविण्यात आला असून मंदिर झाकण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलणार होते नवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर हटवण्यात आल्याची माहिती बाहेर पडताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उपरोधिक आंदोलन केले.
‘देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही मंदिरात आलो होतो.
या मंदिरातील देव चोरीला गेल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांत देणार आहेत.
पेट्रोल डिझेलचा नैवेद्य
या मंदिरावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
या मंदिरासमोर पेट्रोल- डिझेलचा नैवेद्य दाखवू,दर कमी झाले तर पेट्रोल आणि डिझेलने अभिषेक घालून असा उपहासात्मक नवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलला आहे.
मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाही. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे,
यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण मंदिरात देवच नाही, त्यामुळे देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आले,’