लंडन : शमी-बुमराह : गोलंदाजीमध्ये इंग्रजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांनी फलंदाजीमध्येही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दोघांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ७७ धावांची भागिदारी संघाला सुस्थितीत नेले. शमीने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे चौफेर फटकेबाजी करताना शानदार अर्धशतक ठोकले.
त्याला बुमराहने संयमी नाबाद ३० करत उत्तम साथ दिली. शमी-बुमराह या जोडगोळीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताची निर्णायक आघाडी अडीचशेच्या पार पोहोचली. शमीने लाँग ऑनवरून उत्तुंग षटकार ठोकत कारकिर्दीमधील दुसरे अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीला ड्रेस रुममधील सहकाऱ्यांनी चांगलीच दाद दिली.
पाचव्या दिवशी लंचसाठी खेळ थांबला तेव्हा भारताने ८ बाद २८६ धावा केल्या आहेत. शमी ५२, तर बुमराह ३० धावांवर खेळत आहे. आघाडी २५९ धावांवर गेल्याने या कसोटीत भारताने पराभव टाळला आहे असे म्हणायला हरकत नाही.
दोघांनी इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दोघांनी केलेल्या फलंदाजीने इंग्लंडचा कॅप्टन ज्यो रुटला आपली नाराजी लपवता आली नाही.
दोघांनी केलेल्या ७७ धावांच्या भागीदारीने भारत आव्हानात्मक धावसंख्या उभारु शकला, पण विक्रमही रचला गेला.
भारतासाठी यापूर्वी नवव्या विकेटसाठी याच मैदानावर १९८२ मध्ये कपिल देव आणि मदन लाल यांनी ६६ धावांची भागिदारी केली होती. ती आज मोडीत काढत नवा माईलस्टोन शमी आणि बुमराह जोडीने सेट केला.
तत्पूर्वी, दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताने आपल्या कालच्या ६ बाद १८१ धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली.
पहिल्या अर्ध्या तासामध्येच नाबाद असलेला रिषभ पंत बाद झाल्याने भारताची दोनशे तरी आघाडी होणार का? अशी काळजी सतावू लागली. इशांत शर्माही बाद झाल्यानंतर शमी आणि बुमराहची जोडी जमली.