अकोला: दि.१४ राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात पार पडली. यावेळी मार्च २०२१ अखेरीच्या पुनर्वियोजन प्रस्तावास मान्यता देऊन जुलै २०२१ अखेरीच्या खर्चाचा आढावा घेऊन मान्यता देण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ.डॉ. रणजीत पाटील, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार तसेच सर्व सदस्य व सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
स्न २०२०-२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा १०० टक्के खर्च झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी विषयपत्रिकेनुसार, जिल्ह्याच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील खर्चास मंजूरी देण्यात आली. तसेच सम २०२०-२१ मधील पुनर्विनियोजन प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
तसेच स्न २०२१-२२ च्या जुलै अखेरीस झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याला सन २०२१-२२ साठी सर्वसाधारण योजनेसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून १२ कोटी ५२ लक्ष निधी वितरीत केला असून जुलै महिन्याअखेर ९ कोटी ९४ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यावेळी सदस्यांनी व आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.