मुंबई : कोकणात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे महाड चिपळूण परिसरातील उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच महाड चिपळूण मध्ये नुकसान झालेल्यांना विमा अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहेत.
उद्योगमंत्री सुभाष देसाई (Minister Subhash Desai) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या पाहणीनंतर हा अंदाज काढण्यात आला आहे.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी महाड व नवीन महाड औद्योगिक वसाहतीला भेट देऊन नुकासानीचा आढावा घेतला. महाड व नवीन महाड एमआयडीसी परिसरात सुमारे दोन हजार एकरवर पसरलेल्या औद्योगिक वसाहतीला पुराचा मोठा फटका बसला. अनेक उद्योगांची दालने पाण्याखाली गेल्याने मशिन, साहित्य व मालाचे नुकसान झाले. काही ठिकाणी तयार कच्चा पक्का मालही वाहून गेला.
पी. डी. मलिकनेर यांनी चिपळूण औद्योगिक वसाहतीतील नुकसानाची आढावा घेतला. येथील 161 उद्योगांपैकी 50 उद्योगांचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम झाला. काही ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. एमआयडीसी कार्यालयांत पाणी भरल्याने काही कागदपत्रे देखील भिजली आहेत. अनेक ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील.
काही उद्योगांनी विमा कवच घेतले परंतु विमा कंपन्याकडून उद्योजकांना कागदपत्रांची मागणी केली जात आहे. परंतु कागदपत्रे भिजल्याने ते देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी उद्योजकांना केल्या आहेत.
महापुराचा फटका एमआयडीसीच्या कार्यालयांना देखील बसला आहे. येथील अभियांत्रिकी विभागाचे कार्यालय पाण्याखाली गेले होते. त्यात अनेक नस्ती भिजल्या आहेत. त्या अद्यायावत करण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.