ट्विटरने राहुल गांधी यांच्या विरुद्ध कारवाई करत त्यांचे अकाऊंट सस्पेंड केले होते. त्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनोखे डीजिटल आंदोलन सुरु केले. त्यांनी आपापली ट्विटर अकाऊंट आपला नेते राहुल गांधी यांच्या नावाने केली आहेत.
या आंदोलनात काँग्रेस नेते अलका लांबा, यूथ काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीवी, उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी सहभाग घेतला. याचबरोबर काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वधेरा यांनीही आपल्या अकाऊंटच्या प्रोफाईलवर राहुल गांधी यांचा फोटो लावला आहे.
दरम्यान, यूथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी ‘तुम्ही किती ट्विटर अकाऊंट थांबवणार? प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी यांचा आवाज होऊन तुम्हाला प्रश्न विचारणार. या सर्वजन या जन-आंदोलनाचा एक भाग होऊया.’ असे ट्विट केले.
काँग्रेसने ट्विटरवर राहुल गांधी यांच्याबरोबरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची ट्विटर अकाऊंट लॉक केल्याचा आरोप केला. बुधवारी रात्री ट्विटरने काँग्रेसच्या पाच वरिष्ठ नेत्यांची ट्विटर अकाऊंट लॉक केली होती. यात राहुल गांधींबरोबरच माजी मंत्री अजय माकन, मणिकम टागोर, आसाम प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांचा समावेश आहे.
आवाज उठवणे गुन्हा तर तो शंभरवेळी करणार : काँग्रेस
काँग्रेसने ट्विटरच्या कारवाईवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली की, ‘ज्यावेळी आमच्या नेत्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळीही आम्ही घाबरलो नव्हतो. आता ट्विटर अकाऊंट बंद करण्याने आम्ही काय घाबरणार! आम्ही काँग्रेस आहोत, जनतेचा संदेश आहोत, आम्ही लढत राहणार. जर बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आवाज उठवणे गुन्हा आहे तर हा गुन्हा आम्ही शंभरवेळा करु. जय हिंद.. सत्यमेव जयते!’
काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांची ५ हजार अकाऊंट ब्लॉक
काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी सांगितले की, काँग्रेचे नेते आणि कार्यकर्ते असे मिळून जवळपास ५ हजार ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यांनी ट्विटर सरकारच्या दबावाखाली काम करत आहे असा आरोप केला.
ते म्हणाले की, ट्विटरवर निश्चितच सरकारचा दबाव आहे. कारण ज्यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही पीडित मुलीच्या आई वडिलांचा फोटो शेअर केला होता. पण, त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले नाहीत.
राहुल गांधीनी ट्विट केला पीडित मुलीच्या कुटुंबाचा फोटो
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर ट्विटरने सांगितले की आम्ही राहुल गांधी यांचे ते ट्विट हटवले कारण ते आमच्या पॉलिसीचे उल्लंघन करत होते. याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांचेही अकाऊंट लॉक केले असल्याचे ट्विटरने सांगितले.
ट्विटरचे उत्तर
ट्विटरच्या म्हणण्यानुसार जर कोणते ट्विट आमच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर ट्विटर त्या अकाऊंड होल्डरला नोटिस बजावते. त्यानंतर ते वादग्रस्त ट्विट हाईड केले जाते आणि जोपर्यंत ते ट्विट काढून टाकले जात नाही किंवा त्याच्याबाबतच्या अपिलवर कारवाई होत नाही तोपर्यंत ते ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले जाते.
एनसीपीसीआरने केली होती तक्रार
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राहुल गांधींच्या या ट्विटबाबत दिल्ली पोलीस आणि ट्विटरकडे तक्रार केली होती. एनसीपीसीआरने पीडिच मुलीच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. एनसीपीसीआरच्या मते हे पोस्को ( POSCO ) कायद्याचे उल्लंघन आहे.