अकोला, दि.१२- रविवार दि.१५ ऑगस्ट रोजी होणारा भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण हे जिल्हा, उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवर करण्यात यावे,असे निर्देश शासनाने दिले असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
यासंदर्भात शासन परिपत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्याच्या मुख्यालयी पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ हा सर्व ठिकाणी एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ वा. पाच मि.नी होईल. त्यामुळे सकाळी आठ वा. ३५ मि. ते सकाळी ९ वा. ३५ मि. या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजीत करु नये. जर एखाद्या संस्थेला वा कार्यालयाला ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्यांनी सकाळी आठ वा. ३५ मि. पूर्वी किंवा ९ वा. ३५ मि. नंतर आयोजीत करावा. कोविडची पार्श्वभुमी लक्षात घेता स्वातंत्र्य दिन समारंभात सामाजिक अंतर, मास्क लावणे आवश्यक आहे,असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.