अकोला- नाबार्डच्या कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत सेवा सहकारी संस्थांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध असून जिल्ह्यातील संस्थांनी या योजेनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयामार्फत देण्यात आलेली माहिती अशी की, नाबार्ड बॅंकेने प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांकरीता कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत पिक कापणीनंतरच्या व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सवलतीच्या दरात कर्ज दिले जाते. त्यात ऑईल मिल, गोदाम उभारणी, संकलन केंद्र, शीतगृह, प्राथमिक प्रक्रिया उद्योग, रायपनिंग चेंबर, थ्रेशर, हार्वेस्टर, ट्रॅक्टर इ. व्यवसायांकरीता सवलतीच्या व्याज दरात कर्ज वाटप केले जाते. त्यातही सेवा सहकारी संस्थांना चार टक्के व्याज दराने कर्ज दिले जाणार असून यात तीन टक्के व्याज अनुदानही दिले जाणार आहे. थोडक्यात संस्थांना केवळ एक टक्क व्याज दराने कर्जांची उपलब्धता होणार असून ही व्याज सवलत योजना ही दोन कोटी रुपयांच्या मर्यादेच्या कर्जास लागू आहे. या योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांनी घ्यावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात प्रकल्प उभारावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा विकास प्रबंधक , कृषी व ग्रामीण बॅंक, अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मर्या. अकोला तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था अकोला यांनी केले आहे.