अकोला- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, अकोला हे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरीता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता एकूण चार योजना राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
या योजनांची माहिती शासनाची अधिकृत वेबसाईट पाहून किंवा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून घ्यावी व अर्ज सादर करावा. या योजना राबविण्याकरीता कुठल्याही खाजगी व्यक्तीची किंवा संस्थेची नेमणूक करण्यात आलेली नाही, याची नोंद घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
योजनांची माहिती-
१. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना- ही योजना केंद्र शासन पुरस्कत असून उद्योग व सेवा उद्योग व्यवसायासाठी या योजनेमार्फत २५ लाख रुपये प्रकल्प किमती इतके कर्ज बॅंकेमार्फत मंजूर होऊ शकते. या योजनेत विविध प्रवर्गाकरीता १५ ते ३५ टक्के अनुदान मिळू शकते. या योजने करीता सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने होत असते . ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, अकोला आणि खादी व ग्रामोद्योग आयोग, नागपूर यांच्यामार्फत राबविण्यात येते. या योजनेकरीता अधिक माहिती व अर्जासाठी वेबसाईट www.kviconline.gov.in
२. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना– ही योजना राज्य शासन पुरस्कत असून उद्योगासाठी ५० लाख रुपये व सेवा उद्योगासाठी दहा लाख रुपये प्रकल्प किमती एवढे कर्ज बॅंकेमार्फत मंजूर होऊ शकते. या योजनेत विविध प्रवर्गाकरीता १५ ते २५ टक्के अनुदान मिळू शकते. या योजने करीता सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने होत असते. ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादीग्रामोद्योग मंडळ अकोला यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेकरीता https://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर माहिती घेऊन, अर्ज भरावा.
३. सुधारित बीज भांडवल योजना- ही योजना राज्य शासन पुरस्कत असून जिल्हा उद्योग केंद्र, अकोला कार्यालय आणि बॅंक यांच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येते. या योजने अंतर्गत उद्योग,सेवा व व्यापार या प्रकारात व्यवसाय करण्याकरीता जास्तीत जास्त २५ लाख रुपये प्रकल्प किंमती इतके कर्ज बॅंकेमार्फत मिळू शकते. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारास एकूण मंजूर प्रकल्प किंमतीच्या १५ टक्के व अनुसुचित जाती व जमातीचे प्रवर्गातील अर्जदारास दहा लाख रुपये प्रकल्प किंमतीच्या प्रकल्पाकरीता २० टक्के व त्यावरील रकमेसाठी १५ टक्के बीज भांडवल कर्ज रक्कम वार्षिक सहा टक्के व्याज दाराने जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत दिली जाते.
४. जिल्हा उद्योग केंद्र योजना- ही योजना राज्य शासन पुरस्कत असून जिल्हा उद्योग केंद्र, अकोला कार्यालय आणि बॅंक यांच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येते. या योजने अंतर्गत उद्योग, सेवा या प्रकारात व्यवसाय करण्याकरीता जास्तीत जास्त दोन लाख रुपये प्रकल्प किंमती एवढे कर्ज बॅंकेमार्फत मिळू शकते. योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारास एकूण मंजूर प्रकल्प किंमतीचे २० टक्के व अनुसुचित जाती व जमातीचे प्रवर्गातील अर्जदारास प्रकल्प किंमतीचे ३० टक्के बीज भांडवल कर्ज रक्कम वार्षिक चार टक्के व्याज दराने जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत दिली जाते.