शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, या संत तुकाराम यांच्या ओवीचा अर्थ खूप गहन आहे. देशाचे भविष्य हे देशातील बालके आहेत. या बालकांचे आरोग्य उत्तम असणे हे देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे द्योतक आहे. हे भविष्य जिच्या कुशीत जन्मते ती माता, म्हणुनच महनीय ठरते. थोडक्यात चांगली सुदृढ पिढी जन्माला यावी यासाठी मातेचे आरोग्य उत्तम राखणे आवश्यक आहे.
कुपोषणामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आपल्या देशात दर तीन स्त्रियांमध्ये एक स्त्री कुपोषित आहे, तर दोन स्त्रियांमध्ये एक स्त्री रक्तक्षयग्रस्त (ॲनिमीक)असते. अशा स्त्रियांची जन्मलेली बालके कमी वजनाची असण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात, जेव्हा कुपोषण मातेच्या गर्भाशयात सुरु होते, तेव्हा या बाबीचा बाळाच्या जीवन चक्रावर परिणाम होतो. यामुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांमध्ये सुधारणा करता येणे नंतर शक्य होत नाही.
आर्थिक व सामाजीक ताण-तणावामुळे खूप स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत काम करीत असतात. तसेच बाळाच्या जन्मानंतरही त्या लवकरच कामास सुरुवात करतात. गरोदरपण आणि बाळाच्या स्तनपानाच्या कालावधीत त्यांच्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता पूर्वपदावर येण्यास बाधा निर्माण होते. परिणामी बाळाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ स्तनपान करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. बाळाच्या आरोग्याची पायाभरणी करण्याचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात बाळा सोबतच मातेचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी भारत सरकारने दि. 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कार्यान्वित केली आहे.
ही योजना देशातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार अंमलात आणली आहे. या अंतर्गत गरोदर व स्तनदा मातांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर व स्तनदा मातांच्या बॅंक खात्यात पाच हजार रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना राज्यांना व केंद्रशासीत प्रदेशांना या योजनेच्या थेट लाभासाठी ई-क्रॉस अकाऊंट मध्ये केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते.
योजनेचे उद्देश: प्रसुती अगोदर व प्रसुती नंतर पहिल्या जिवंत बाळाकरीता मातेस विश्रांती मिळावी यासाठी बुडीत मजुरीचा लाभ देणे. गर्भवती व स्तनदा मातांना योग्य पोषण तत्वे मिळण्याकरीता आर्थिक मदत. हा आर्थिक मोबदला दिल्यामुळे गरोदर माता व स्तनदा माता यांचा आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकडे कल वाढेल. सुदृढ माता सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून मातांना गरोदरपणात व स्तनपान कालावधीत पौष्टीक अन्न मिळावे तसेच त्यांना विश्रांती मिळावी, यासाठी ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत सर्व गरोदर व स्तनदा माता यांना लाभ अनुज्ञेय आहे. परंतु ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत अशा मातांना लाभ अनुज्ञेय नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील त्यांनाही हा लाभ दिला जात नाही. सर्व गरोदर माता व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी हा लाभ देता येईल. गरोदरपणाची तारीख व पात्र लाभार्थ्यांची स्थिती ही एम.सी.पी. कार्डवर नोंदविलेल्या मासिक पाळीनुसार गृहीत धरण्यात येईल. गर्भपात किंवा उपजत मृत्यू असेत तर, पात्र लाभार्थीस एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. एखाद्या वेळेस गर्भपात किंवा उपजत मृत्यू झाल्यास त्या पात्र लाभार्थीस या योजनेतील लाभाचे उर्वरित हप्ते पुढील गरोदरपणामध्ये देता येतील.
प्रथम हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा गर्भपात झाल्यास तिला पुढील दुसरा व तिसरा हप्ता देता येणार नाही. तथापि, पुढील गरोदरपणात जर ती लाभार्थी नियमानुसार पात्रतेत व निकषात बसत असेल तर, तिला पुढील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा लाभ देता येईल. याचप्रमाणे गर्भपात किंवा उपजत मृत्यू जर पहिला व दुसरा हप्ता दिल्यास झाला असेल तर पुढील गरोदरपणात सर्व निकषात लाभार्थी बसत असेल तर केवळ तिसरा हप्ता देता येईल.
अर्भक मृत्यू असेल तर पात्र लाभार्थीस या योजनेत फक्त एकदाच लाभ घेता येत असल्यामुळे जर लाभार्थ्याने एक वेळेस लाभ घेतला असेल आणि तिच्या अपत्याचा अर्भक मृत्यू झाला असेल तर तिला या योजनेचा परत लाभ देता येणार नाही. गरोदर व स्तनदा अंगणवाडी कार्यकर्ती / अंगणवाडी मदतनीस/ आशा या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्यांना हा मोबदला देता येणार आहे.
लाभ कसा दिला जातो: नगदी प्रोत्साहन तीन हप्ते म्हणजे प्रथम एक हजार रूपये गरोदरपणाची लवकर नोंद अंगणवाडी केंद्रात किंवा मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेत केल्यास, दुसरा हप्ता दोन हजार रूपये गरोदरपणाच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपुर्व तपासणी झाली असल्यास तिसरा हप्ता दोन हजार रुपये बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर व बाळास बी.सी.जी., ओ.पी.व्ही., डी.पी.टी. व हिपॉटायसीस –बी लसीकरण मिळाल्यानंतर. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार जननी सुरक्षा योजनेचा (जे.एस.वाय.) लाभ जर त्यांनी दवाखान्यात प्रसूती केली असेल तर देण्यात येतो. जननी सुरक्षा योजनेंतर्गत दिलेला लाभ मातृत्व वंदना योजनेमध्ये गृहीत धरला जातो. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना सरासरी एकूण 6 हजार रूपये मोबदला दिला जातो.
तरी सर्व गरोदर मातांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात नाव नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा व स्वतः व आपल्या बालकाचे आरोग्य उत्तम राखावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
– माहिती संदर्भः आरोग्य विभाग
– संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.