अकोला : राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. रुग्णांमधील आजाराचे निदान वेळेत होऊन त्यावर उपचार सुरू व्हावा या उद्देशाने आरोग्य यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने डेंग्यूसदृश रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तेल्हारा आणि कान्हेरी गवळी येथील डेंग्यूसदृश असलेल्या रुग्णांचे आरोग्य यंत्रणेमार्फत नमुने घेण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
झिका व्हायरसचा राज्यातील पहिला रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला. तज्ज्ञांच्या मते त्या रुग्णाने जिल्ह्याबाहेर कुठलाही प्रवास केलेला नव्हता. अशा परिस्थितीतही त्याला झिका व्हायरसची लागण झाल्याने राज्यभरातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अकोल्यातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. डेंग्यू आणि झिका व्हायरसची लक्षणे सारखीच असल्याने जिल्ह्यातील फिवर रेट असलेल्या भागामध्ये आरोग्य विभागामार्फत मास सर्वेक्षण केले जात आहे. रुग्णाला ताप आल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवसानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तेल्हारा आणि कान्हेरी गवळी भागातील काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी अकोल्यातीलच व्हीआरडीएल लॅबमध्ये ते पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तापाची साथ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मास सर्वेक्षण
डेंग्यू आणि झिका व्हायरसची लक्षणे सारखीच आहेत.
त्यामुळे ज्या भागात फिवर रेट वाढला आहे, अशा भागात मास सर्वेक्षण केले जात आहे.
शिवाय, खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहितीवर लक्ष ठेवले जात आहे.
ही आहेत झिकाची लक्षणे
ताप येणे.
अंगावर रक्ताचे बारीक स्पॉट आढळणे.
पायापासून डोक्यापर्यंत पॅरालिसीस झाल्याची लक्षणे
वाशिम, अमरावती जिल्ह्यात आढळले डेंग्यूचे रुग्ण
अकोल्यात आतापर्यंत एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही, मात्र वाशिम आणि अमरावती या शेजारील जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठीही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डेंग्यूसोबतच झिकाचा धोका पाहता आरोग्य विभागाची ३ ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी घ्यावी ही काळजी
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छता पाळावी
पाणी साठवून ठेवू नये
झिका आणि डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यातच तयार होतो.
त्यामुळे पाण्याची भांडी नियमित धुवावीत.
आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी कोरडी ठेवावीत.
जिल्ह्यात कीटकजन्य आजारांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ज्या भागात तापाचे रुग्ण जास्त आहेत, अशा परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू आणि झिकाची लक्षणे सारखीच आहेत. तेल्हारा आणि कान्हेरी गवळी येथील डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी व्हीआरडीएल लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत.
– डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला