अकोला: गेल्या तब्बल 17 वर्षांपासून सुगत वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला’ अंतर्गत ‘चाईल्ड लाईन’ च्या चमूने तेल्हारा तालुक्यातील दोन बालकांची त्यांच्या मद्यपी पित्याच्या त्रासातून सुटका केली. यापैकी मुलाला शासकीय बालगृहात तर बालिकेला गायत्री बालिकाश्रमात शनिवार, 31 जुलै रोजी दाखल करण्यात आल्याची माहिती ‘चाईल्ड लाईन’ च्या समन्वयिका हर्षाली गजभिये आणि सदस्य विक्रांत बन्सोड यांनी दिली. संपूर्ण अकोला जिल्ह्यात कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईन – 1098 च्या कार्यालयामध्ये 18-07-2021 रोजी तेल्हारा येथील समाजसेविका दिपीका देशमुख यांनी या दोन लहान मुलांबाबत माहिती दिली. ही दोन बालके तेल्हारा तालुक्यातील भीमनगर येथील रहिवासी असून, त्यांचे मद्यपी वडील या मुलांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत उलट दारू पिऊन दररोज त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी चाईल्ड लाईनच्या चमूतील सदस्य राजेश मनवर यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल इंगळे यांच्यासोबत 19-07-2021 रोजी सदर ठिकाणी भेट देवून पाहणी केली असता, सदर बालके आणि त्यांचे वडील आढळून आले नाहीत. मुलांसंदर्भात शेजारी चौकशी केली असता, शेजारी राहणारयांनी माहिती दिली, की बालकांच्या वडिलांना दारूचे व्यसन असून, सदर बालकांच्या आईने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या बालकांचे वडील हे दारू पिऊन मुलांना त्रास देतात, मुलांना मारहाण करतात, मुलांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तू देत नाहीत, त्यामुळे मुले हे घरी राहत नसून, बाहेर इतरत्र झोपतात. सदर बालके ही इतरांकडे भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत असतात. यासाठी दोन्ही बालकांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालगृहात प्रवेशित करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतरही चाईल्ड लाईनच्या चमूने या मुलांचा शोध सुरुच ठेवला. दरम्यान, 30/07/2021 रोजी या मुलांना शोधण्यात चमूला यश मिळाले. त्यानंतर 31/07/2021 रोजी चाईल्ड लाईनचे सदस्य राजेश मनवर आणि महिला पोलिस श्रीमती रीना यांच्यामार्फत मुलांना अकोला येथे आणून समन्वयिका हर्षाली गजभिये आणि सदस्य विक्रांत बन्सोड यांच्यामार्फत सदर मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी व कोविड-19 ची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अकोला येथील बाल कल्याण समितीच्या मौखिक आदेशानुसार मुलाला तुकाराम चौकातील शासकीय बालगृह येथे आणि बालिकेला मलकापूर येथील गायत्री बालिकाश्रम येथे प्रवेशित करण्यात आले आहे.