TET Exam महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
त्यानुसार येत्या १० ऑक्टोबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना दि. ३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहे. परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी ही माहिती दिली आहे.
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ ,सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही.
त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणार्या उमेदवारांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी ७ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख उमेदवार यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.
परीक्षा परिषदेतर्फे ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतल्या जाणा-या टीईटी परीक्षेसाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हॉलतिकीट काढता येणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात व दुपारच्या सत्रात टीईटी परीक्षेचा पहिला व दुसरा पेपर घेतला जाईल.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या ४० हजार रिक्त जागा टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिक्षक होण्यासाठी टिईटी अनिवार्यच असल्यामुळे परीक्षा देणार्या उमेदवारांची संख्या यंदा वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.