अकोला– किटकनाशकांच्या फवारणी करताना शेतकरी व शेतमजूर यांना विषबाधा होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे किटकनाशक फवारणी सुरक्षितरित्या कशी करावी याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग, सिजेन्टा इंडीया लि. व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ सुरक्षित फवारणी अभियान’ राबविण्यास आजपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात प्रचाररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचाररथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेची सुरुवात केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे, सिजेंटा इंडीयाचे प्रतिनिधी समीर भोसले, सुरक्षित फवारणी अभियानाचे जिल्हा प्रतिनिधी आशिष मोघे यांची उपस्थिती होती.
सुरक्षित फवारणी अभियानाअंतर्गत प्रचाररथाव्दारे आजपासून जनजागृती करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्याच्या तालुका व ग्रामीण भागात प्रचाररथ फिरणार आहे. या रथाव्दारे दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. फवारणी करतांना शेतकऱ्यांनी व शेतमजूरांनी काय काय खबरदारी घ्यावी याबाबत मा प्रचाररथाद्वारे माहिती दिली जाणार आहे; तरी जिल्ह्यातील मजूर व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.