नवी दिल्ली : JEE परीक्षा : राज्यातील ९ जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसाने केलेल्या महाप्रलयाने राज्यात जवळपास १५० जणांचा करुण अंत झाला आहे.
अनेक जिल्ह्यांमधील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, जेईई सत्र ३ साठी महापूरग्रस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येईल.
त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातील विद्यार्थी समुदायाला मदत करण्यासाठी मी राष्ट्रीय चाचणी संस्थेला सल्ला दिला आहे की, परीक्षा देता येऊ शकणार नाही अशा सर्व उमेदवारांना आणखी एक संधी उपलब्ध करुन द्या.
शिक्षणमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, महापूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.
ज्या विद्यार्थ्यांना पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परीक्षा देता येणार नाही, त्यांना जेईई सत्र ३ ची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल. 25 जुलै आणि 27 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेत पावसामुळे संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांची एनटीए पुन्हा परीक्षा घेईल.
मात्र, जेईईच्या पुनर्परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा येथील विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य सत्र ३ मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.