अकोला: अकोला जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाने अकोला महापालिका आयुक्त निमा अरोरा यांची नियुक्ती केली आहे. तर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने इतर ही जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्यांची बदली केली आहे. पण, अकोल्यात जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्यात झालेली ही बदली पहिल्यांदाच झाली असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे 2010 बॅचचे अधिकारी आहे. त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी म्हणून होती. त्यांनी कोरोना संकटात अकोल्यात महत्वाचे निर्णय घेतले. त्याच बरोबर अनेक प्रकल्पांना गती दिली. जितेंद्र पापळकर यांनी रस्ते निर्मितीला गती देण्याबरोबर ऑक्सिजन प्लॉट उभारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले. कोरोना संकटात त्यांनी गतीमान प्रशासन व आरोग्य यंत्रणा राबवित अकोलेकरांना दिलासा दिला. जितेंद्र पापळकर हे मितभाषी, संयमी असल्याने त्यांना जिल्हाधिकारी या पदाचा कधी बडेजाव केला नाही. लोकहिताचे काम करण्यात त्यांनी प्राधान्य दिले. त्याची आज राज्य शासनाने बदली करत महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी निश्चित केली आहे.
तर 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या निमा अरोरा यांनी महापालिकेचा कारभार हातात घेतल्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. त्यांनी आक्रमकपणे महापालिकेतील अनेक ठराव विखंडीत करण्यासाठी पाठविले. महापालिका आयुक्त निमा अरोरा यांची बदली अकोला जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकाच जिल्ह्यात अशा प्रकारे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या बदलीने प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या बदल्यांबरोबर राज्यातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांची बदली झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.