नवी दिल्ली : रशियातील असणारी कोरोना लस स्पुटनिक-व्ही लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. कोरोनावरील वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोडा यांनी म्हंटलंय की, “ही लस मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या स्पुटनिक-व्ही लस केवळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होती. आता सरकारद्वारे दिली जाणारी लस ही पुरवठ्यावर अवलंबून असणार आहे. आम्हाला ती मोफत लसीकरण मोहिमेतून उपलब्ध करायची आहे”, अशी माहिती डाॅ. अरोडा यांनी दिली आहे.
रशिया निर्मित स्पुटनिक-व्ही या लसीचा १८ अंश सेल्सियस तापमानामध्ये साठा करावा लागतो. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सहज शक्य होणार आहे.
डाॅ. अरोडा पुढे म्हणाले, “पोलिओ लसीकरणामुळे काही भागात कोरोना लसीकरण धिमे झाले आहे. आता कोरोना लसीकरण पुढील आठवड्यापासून वेगाने होईल. आजवर ३४ कोटी लसी टोचण्यात आल्या आहेत. जुलैच्या अखेरीस १२ ते १६ कोटी डोस मिळतील”, अशी माहिती डाॅ. अरोडा यांनी दिली आहे. यापूर्वीच केंद्राने जानेवारीतच असे सांगितले होते की, जुलैपर्यंत ५० कोटी डोस देण्यात येतील.
टार्गेट दररोज १ कोटी लस देण्याचं!
देशात कोरोना लसीकरणामध्ये मोठा वाटा कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा आहे. अरोडा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार लसीकरणाचे उत्पादन वाढविण्याशिवाय, स्पुटनिक-व्ही लस आणि मॉडर्ना आणि झायडस कॅडिलाची नवीन लस आल्यास दररोजचे ५० लाख डोस वाढून ८० लाख किंवा १ कोटी होऊ शकतात. सरकारचे लक्ष्य या वर्षाच्या शेवटी १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला लस देण्याचे आहे. आयसीएमआरच्या एका ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आहे. अशावेळी देशाकडे ८ महिन्यांचा वेळ आहे. तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरिएंटला जोडणे ही घाई होईल. भारतात या व्हेरिअंटचे ५२ रुग्ण सापडले आहेत.