कोरोना संकटामुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या काही परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत, तर काही परीक्षाच झाल्या नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करतात. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून रात्रंदिवस अभ्यास करतात. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ‘एमपीएससी’चे वेळापत्रक बिघडले आहे. फेब—ुवारी 2019 ला राज्यसेवा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. जानेवारी 2020 मध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ या संयुक्त गट ब परीक्षा कोरोनाच्या नावाखाली पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 2020, 2021 मधील विविध पदांची जाहिरात अद्याप काढलेली नाही.
अभियांत्रिकी पूर्व, एएमव्हीआय (असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर) परीक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. राज्यसेवा परीक्षा मार्च 2020 मध्ये झाली. त्या परीक्षेचा निकाल नाही. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मार्च 2019 ला पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली. परंतु, शारीरिक चाचणी व मुलाखत अद्याप घेण्यात आली नाही.
कोरोनामुळे परीक्षा वेळेत न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थी अभ्यासच करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेकांनी ‘एमपीएससी’ सोडून दुसर्या पर्याय शोधला आहे. मिळेल ती नोकरी अनेकांनी पत्करली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परीक्षार्थींमधून होत आहे.
स्वप्निलच्या मृत्यूस जबाबदार कोण?
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा तो उत्तीर्ण झाला. दोन वर्षांपूर्वी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा झाली आहे. परंतु, अद्याप मुलाखती झालेल्या नाहीत. मुलाखतीची वाट पाहतच पुण्यातील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आयुष्य संपवले. यास जबाबदार कोण, असा सवाल स्पर्धा परीक्षार्थींमधून उपस्थित केला जात आहे.
आयोगावर सदस्यांची नियुक्ती कधी?
गेले तीन वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दोनच सदस्य आहेत. इतर सदस्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात अद्याप सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही. इतर सदस्यांची नियुक्ती तातडीने व्हायला हवी. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतलेल्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, निकालही प्रलंबित राहत असल्याचे स्पर्धा परीक्षार्थींचे म्हणणे आहे.
राज्य लोकसेवा आयोग व राज्य शासनाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. निकाल लागूनही नियुक्ती मिळण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे उमेदवारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. शासनान आतातरी धडा घ्यावा.
– राहुल काटकर, परीक्षार्थी
कोरोना काळात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा घेऊ शकते. मग, राज्य लोकसेवा आयोगास का जमत नाही? राज्य लोकसेवा आयोग स्वायत्त असून त्यांनी सरकारच्या इशार्यावर काम करणे यास अर्थ नाही. निकाल व नवीन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे.
– विद्या कुंभार, परीक्षार्थी